गुटखा जप्त करण्याचा पोलिसांना अधिकार नाही.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- शासनाकडून प्रतिबंधित असलेला गुटखा आणि तंबाखूजन्य पदार्थ धाड टाकून जप्त करण्याचा पोलीस खात्याला कोणताही अधिकार नाही, असा महत्वपूर्ण निर्णय उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती देशपांडे व न्यायमूर्ती उपाध्याय यांनी दिला आहे.अन्न व औषधी प्रशासनाच्या अख्त्यारीत असलेल्या गुटखा व तंबाखूजन्य पदार्थांच्या बाबतीत पोलिसांनी केलेल्या कारवाईवर या निर्णयाने प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. अकोला येथील पान दुकानदार वाहेद खान यांच्यावर पोलिसांनी कारवाई करून गुटखा व तंबाखूजन्य पदार्थ जप्त केले होते. या पोलिसांच्या कारवाईिवरोधात त्यांनी उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल करून आपल्या व्यवसायाच्या अनुषंगाने पोलिसांना कारवाई करण्याचा किंवा माल जप्त करण्याचा अधिकार नाही, हे दोन्ही पदार्थ शासनाने प्रतिबंधित केले आहेत, मात्र गुटखा व तंबाखूजन्य पदार्थ हे अन्न व औषधी वर्गवारीत असल्याने पोलिसांना कायद्याने कारवाई करण्याचा अधिकार आहे का? तेव्हा पोलिसांनी आपल्या व्यवसायात हस्तक्षेप करू नये, अशी विनंती याचिकेत केली होती. 


Loading...
याचिकाकर्ता वाहेद खान याच्याकडून ॲड. शाम मोहता यांनी बाजू मांडताना कारवाईचे अधिकार अन्न व औषधी प्रशासन विभागाला आहे. जी वर्गवारी केली गेली, त्यामुळे पोलिसांना कारवाई करण्याचे अधिकार नाही. याबाबत कायद्यात असलेली तरतूद, विविध न्यायालयांनी दिलेले निकाल न्यायमूर्तींसमोरील युक्तीवादात सादर करण्यात आले. सरकार पक्षाची बाजू ॲड. नितीन रेडे यांनी मांडली. युक्तीवाद आणि कायदेशीर बाबी तपासून न्यालयाने याचिका निकाली काढताना याचिकाकर्त्याच्या व्यवसाय क्षेत्रात पोलिसांनी यापुढे कारवाई करू नये, असे निर्देश दिले. 

विभागीय पोलीस आयुक्त आणि विभागीय पोलीस अधिक्षक या दोन वरीष्ठ अधिकाऱ्यांच्या अधिनस्त असलेल्या कुठलेही पोलीस अधिकारी व पोलीस कर्मचारी यांना प्रतिबंधीत गुटखा व तंबाखूजन्य पदार्थांवर धाड घालून जप्त करण्याचा अधिकार नसल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे पोलिसांनी धाड टाकण्याची व साठा जप्त करण्याची कारवाई करू नये, असा निकाल देत याचिका निकाली काढली. याअगोदरही जिल्ह्यातील व्ही. एस. चोपडा नावाच्या व्यापाऱ्याने मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली होती. त्यावेळीही न्यायालयाने याप्रमाणेच निकाल दिला होता.

----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.