सार्वजनिक वाढदिवस साजरा करण्याला बसणार चाप.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- गेल्या काही वर्षांत सार्वजनिकरित्या चौकाचौकात धुमधडाक्यात वाढदिवस साजरे करणाऱ्यांची अखेर नेवासा पोलिसांनी स्वत:हून गंभीर दखल घेतली आहे. यापुढील काळात असले प्रकार करणाऱ्यांना सज्जड इशारा देण्यात आल्याने रस्त्यावर वाढदिवस साजरा करणाऱ्याचे चांगलेच धाबे दणाणले आहे. 


Loading...
सर्वसामान्य जनतेमधून या निर्णयाचे स्वागत होत आहे. सार्वजनिक ठिकाणी विशेषत: चौकाचौकात आणि फटाक्यांची आतिषबाजीत वाढदिवस साजरे होत होते. सार्वजनिकरित्या वाढदिवस साजरा करण्यामुळे शहराच्या विद्रुपीकरणात एकप्रकारे मोठी भरच पडत होती. 

यानिमित्ताने रस्त्यांने जाणाऱ्या येणाऱ्यांची विशेषत: महिला वर्गाची कुचंबणा होत होती. यावर जाहीरपणे आक्षेप घेण्याच्या भानगडीत कोणी पडत नव्हते. गेल्या काही महिन्यांपूर्वी नेवासा पोलीस ठाण्याचा कार्यभार स्वीकारलेले पोलीस निरीक्षक डॉ. शरद गोर्डे यांनी त्यांची वक्रदृष्टी अशाप्रकारे वाढदिवस साजरे करणाऱ्यांकडे वळविली. 


सार्वजनिकरित्या वाढदिवस साजरे करणाऱ्यांसाठी त्यांनी आचारसंहिताच आखून दिली आहे. त्यानुसार यापुढील काळात कोणालाही विनापरवानगी सार्वजनिकरित्या वाढदिवस साजरे करता येणार नाहीत. तसेच अशाप्रकारे वाढदिवसाचा कार्यक्रम करायचाच ठरल्यास त्यांना सर्वसामान्य लोकांना कुठलाही त्रास होणार नाही याची हमी द्यावी लागणार आहे. 


त्यामुळे डीजेच्या कर्णकर्कश आवाजासह फटाक्यांच्या आतिषबाजीवर निर्बंध येणार आहेत. चौकाचौकात रस्ते अडवून तर कोणालाही वाढदिवस साजरा करता येणार नाही. या आचारसंहितेचे उल्लंघन करण्याचा प्रयत्न केल्यास त्याला वाढदिवसाचा केक खाण्याआधीच पोलीस कारवाईचा कडू प्रसाद ग्रहण करावा लागणार हे निश्चित.

----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.