राजळे व ढाकणे यांच्या दुसऱ्या पिढीतील राजकीय संघर्ष पेटण्याची शक्यता.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- गोपीनाथ मुंडे यांचा ऊसतोडणी कामगार, वंजारी व सर्वच ओबीसी समाजाच्या हक्कासाठीचा संघर्ष उभ्या महाराष्ट्राने पाहिला आहे. त्यांच्याच जिवावर तुम्ही राजकारण केलेत. आता राजकीय असुयेपोटी व स्वत:च्या राजकीय स्वार्थासाठी त्यांच्यावर टीका करणाऱ्या राष्ट्रवादीच्या नेत्यांचा मी निषेध करते. मुंडे यांच्या बदनामीचे हे षडयंत्र हाणून पाडण्याचा इशारा आमदार मोनिका राजळे यांनी दिला आहे. 

Loading...
राजळे व ढाकणे यांच्या दुसऱ्या पिढीतील राजकीय संघर्ष पेटण्याची शक्यता यामुळे निर्माण झाली आहे. राष्ट्रवादीचे नेते ॲड. प्रताप ढाकणे यांचे नाव न घेता आ. राजळे यांनी गुरुवारी पत्रकारांशी बोलताना वरील इशारा दिला आहे. या वेळी पत्रकारांशी बोलताना राजळे म्हणाल्या, ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावरून स्व. गोपीनाथ मुंडे व ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांना बदनाम करण्याचे षडयंत्र राष्ट्रवादीची काही मंडळी रचत आहे. 

मुंडे यांचा ऊसतोडणी कामगार व गरीब ओबीसी समाजासाठीचा संघर्ष उभ्या महाराष्ट्राला माहीत आहे. मुंडे यांचा बदनामीचा डाव उधळून लावू, असा इशारा दिला. मी मुंडे यांची बदनामी करणाऱ्यांचा निषेध करते. तालुक्यातील काही मंडळी स्वत:ची राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी मुंडे स्व. मुंडे यांना व ना. पंकज़ा मुंडे यांना बदनाम करीत आहेत.

स्व. मुंडे यांनी आयुष्यभर गोरगरिबांच्या हक्कासाठी संघर्ष केला. ऊसतोडणी कामगारांना प्रतिष्ठा मिळवून देण्याचे काम त्यांनी केले. त्यांचा वारसा पंकजा मुंडे या समर्थपणे सांभाळीत आहेत. मुंडे यांचे राजकीय व सामाजिक जीवन सर्वांनाच माहीत आहे. 

पाथर्डी तालुक्यावर त्यांनी विशेष प्रेम केले आहे व तालुक्यानेही मुंडे यांना मावशी म्हणून आईची माया दिलेली आहे. आजही मुंडे यांना येथील जनता देव समजते. पंकजा मुंडे या मुंडे साहेबांचा राजकीय, वैचारिक व सामाजिक वारसा जपण्याचे काम करीत आहेत. तालुक्यातील राजकीय वातावरण दूषित करून आपली राजकीय पोळी भाजवण्याचे काम काही मंडळी करीत असल्याचा टोला ढाकणे यांचे नाव न घेता राजळे यांनी लगावला आहे. 

दिवंगत राजीव राजळे राजकीय पटलावर असताना प्रताप ढाकणे व राजळे यांच्यातील राजकीय कलगीतुरा जनतेने अनुभवलेला आहे. आता आमदार मोनिका राजळे व प्रताप ढाकणे यांच्यातील राजकीय संघर्ष पहावयास मिळणार आहे. ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे शेवगाव-पाथर्डीच्या शुक्रवारी दौऱ्यावर येत आहेत.प्रताप ढाकणे यांनी मुंडे यांच्यावर केलेल्या केलेल्या आरोपाला मुंडे काय उत्तर देतात, याकडे जनतेचे लक्ष लागले आहे.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.