तगडे उमेदवार मिळत नसल्याने प्रमुख पक्षांमध्ये गोंधळाची स्थिती !


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- महापालिकेच्या नव्या प्रभागरचनेचा अनेकांनी धसका घेतलेला दिसतो. सर्वच राजकीय पक्षांना त्याची झळ बसण्याची चिन्हे आहेत. ही प्रभाग रचना प्रारुप असली तरी सुनावणीनंतर त्यात किती बदल होईल, याबाबत साशंकताच व्यक्त होते. तूर्त व्याप्ती वाढल्यामुळे अनेक इच्छुक गारठले असून सर्वच राजकीय पक्षांची त्यामुळेच धावपळ सुरू आहे. 


Loading...
सद्यस्थितीत 17 पैकी 5 ते 6 प्रभागांमध्ये सर्वच पक्षांसमोर उमेदवारीचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. या 20 ते 25 जागांवर सर्वांनाच उमेदवारांचा शोध कठीण होऊन बसला आहे. त्यामुळेच सर्वच पक्षांमध्ये सध्या तरी ‘गोंधळात गोंधळ’असेच चित्र आहे. मनपाच्या प्रारूप प्रभाग रचनेवर हरकतींचा पाऊस पडला आहे. 

या हरकतींचा निर्णय 15 सप्टेंबरनंतर होणार आहे. मात्र, सध्या प्रारूप प्रभाग रचना गृहीत धरूनच इच्छुक व राजकीय पक्षांकडून मोर्चेबांधणी करण्यात येत आहे. प्रभागाचा वाढलेला आकार पाहून गुडघ्या बाशिंग बांधलेले अनेक जण दोन पाऊले मागे आले आहेत. प्रभागात बहुतांशी भाग नवीन आलेला आहे. तेथील समस्यांची माहिती नाही, नागरिकांशी संपर्क नाही, शिवाय प्रभाग मोठा असल्याने निवडणुकीत खर्चही मोठाच येईल. 


निवडणुकीत 50 लाखाचा खर्च इच्छुकांकडून गृहीत धरला जात आहे. अशा स्थितीत कशाच्या बळावर निवडणूक लढवायची, अशा विचाराने इच्छुक अस्वस्थ झाले आहेत. तगडे उमेदवार मिळत नसल्याने शिवसेना, भाजप, कॉंग्रेस व राष्ट्रवादी या प्रमुख पक्षांमध्ये गोंधळाची स्थिती निर्माण झाली आहे. 


एका प्रभागात 4 नगरसेवक या प्रमाणात 17 प्रभागात 68 नगरसेवक निवडूण द्यायचे आहेत. निवडणुकीत भाजप, शिवसेना, कॉंग्रेस, राष्ट्रवादी, मनसे हे प्रमुख पक्ष असणार आहेत. त्याचबरोबरच एमआयएम देखील या निवडणुकीत उडी घेण्याच्या तयारीत आहे. 

----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.