पाथर्डीत आश्रमशाळेतील विद्यार्थिनींचा विनयभंग, शिक्षकाविरुद्ध गुन्हा


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- विद्यार्थिनींचा विनयभंग केल्याप्रकरणी आश्रमशाळेतील शिक्षक व व्यवस्थापकाविरुद्ध पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा नोंदविला आहे. पाथर्डी तालुक्यातील एका आश्रमशाळेत शिक्षकदिनाच्या पूर्वसंध्येला हा प्रकार उघडकीस आला. पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. मुलींच्या पालक महिलांनी शिक्षकांना चांगलाच चोप दिला. 


Loading...
तिसगाव येथील एका मुलीच्या पालक महिलेने पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. या आश्रमशाळेतील अधीक्षक नामदेव बबन धायतडक (रा. पालवेवाडी) व शिक्षक ईश्वर सुखदेव सुरशे रा. चितळी, ता. पाथर्डी यांनी मंगळवारी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास आश्रमशाळेतील पाचवी, सहावी व सातवीच्या विद्यार्थिनींचा
विनयभंग केला. 

मुलींनी आपल्या पालकांना ही घटना सांगितली. पालकांनी आश्रमशाळेतील इतर मुलींच्या पालकांना माहिती दिली. नंतर संतप्त महिलांनी आश्रमशाळेतील दोन्ही शिक्षकांना चांगलाच चोप देऊन पोलिसांच्या ताब्यात दिले. मंगळवारी रात्री दोन वाजण्याच्या सुमारास पोलिसांनी दोघांविरुद्ध विनयभंग, बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण कायदा २०१२ आणि अनुसूचिता जाती- जमाती प्रतिंबधक कायद्यानुसार गुन्हा नोंदविला आहे. 


धायतडक व सुरसे यांना अटक केली आहे. ग्रामीणचे पोलिस उपअधीक्षक मंदार जवळे यांनी बुधवारी सकाळी घटनास्थळाला भेट दिली. पीडित मुली व पालक आश्रमशाळेतून निघून गेले आहेत. आणखी काही मुलींचा छळ झाला आहे का, याचा तपास पोलिस करीत आहेत. शिक्षकदिनाच्या पूर्वसंध्येला शिक्षकच विद्यार्थिनींशी गैरवर्तन करतात, ही घटना माणुसकीला काळिमा फासणारी आहे. 


आश्रमशाळेत मागील एक वर्षापासून विद्यार्थिनींचा लैंगिक छळ करण्याचा प्रकार शिक्षक व अधीक्षक करीत होते. आतापर्यंत तीन विद्यार्थिनींनी पोलिसांसमोर छळ झाल्याचे सांगितले आहे. आता शिक्षण झाले नाही तरी चालेल, मात्र तेथे राहणार नाही, असे मुलींनी बोलून दाखविले. 

----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.