आई-वडिलांना घराबाहेर काढल्याने मुलाविरुध्द गुन्हा दाखल.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- संगमनेर तालुक्यातील खंदरमाळ शिवारातील माहुली येथील गणपत भाऊराव घोडेकर (वय ८०) व पत्नी लक्ष्मीबाई गणपत घोडेकर (वय ७५) या वयोवृद्ध दाम्पत्याला मुलाने व सूनेने लाथाबुक्क्यांनी मारहाण करून घराबाहेर काढून दिले.ही घटना रविवारी (दि. २६ ऑगस्ट) रात्री नऊ वाजेच्या दरम्यान घडली. 

या घटनेमुळे तालुक्यासह नगर जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. राज्यातील ही दुसरी तर जिल्ह्यातील पहिली घटना आहे. याप्रकरणी घारगाव पोलीस ठाण्यात मुलगा, सून, नातू, नात सून या पाचजणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. 


Loading...
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, गणपत भाऊराव घोडेकेर व त्यांच्या पत्नी लक्ष्मीबाई गणपत घोडेकर हे दोघे वयोवृद्ध माहुली याठिकाणी राहत आहेत. त्यांना चार मुली व एक मुलगा आहे. चारही मुलींची लग्न झाली असून त्या त्यांच्या सासरी नांदत आहेत. 

घोडेकर हे वयोवृद्ध दाम्पत्य संदीप गणपत घोडेकर (मुलगा), सुवर्णा संदीप घोडेकर (सून), विकास संदीप घोडेकर (नातू), शोभा विकास घोडेकर (नात सून) व अमोल संदीप घोडेकर (नातू) यांच्या समवेत राहत होते. गणपत घोडेकर यांच्या वयोवृद्धाचा फायदा घेत त्यांच्या नावावर असलेले ३३ लाख रूपये त्यांचा मुलगा संदीप याने काढून घेतले. 

संदीप हा आता गणपत घोडेकर व त्यांची पत्नी लक्ष्मीबाई घोडेकर यांचे संगोपन करत नसून जेवण व पाणी देत नाही. त्याचबरोबर त्यांचे औषध पाणीही करत नाही. संदीप घोडेकर (मुलगा), सुवर्णा घोडेकर (पत्नी), विकास घोडेकर (नातू), शोभा घोडेकर (नात सून) व अमोल घोडेकर (नातू) हे सर्वजण वयोवृद्ध घोडेकर दाम्पत्यास मानिसक व शारीरीक त्रास देत होते. 

सदरचा प्रकार नातू विकास याचे लग्न झाल्यापासून सुरु होता. रविवारी (दि. २६ ऑगस्ट) मुलगा संदीप व त्याची पत्नी सुवर्णा या दोघांनी गणपत घोडेकर यांना धक्काबुक्की, शिविगाळ करत घराबाहेर काढले. तसेच घोडेकर व त्यांची पत्नी लक्ष्मीबाई यांना जीवे मारण्याची धमकी दिली. 

त्यामुळे याप्रकरणी गणपत भाऊराव घोडेकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन घारगाव पोलिसांनी वरील पाचजणांविरुद्ध ज्येष्ठ नागरिक पालक यांचे पालनपोषण आणि कल्याण नियम २००७ चे कलम ४ व २४ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.