नगरमध्ये राजकीय उलथापालथ वेगात, पाच ते सहा नगरसेवक शिवसेनेच्या वाटेवर !

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नगरमध्ये राजकीय उलथापालथ वेगात सुरू झाली आहे. कॉंग्रेसचे नगरसेवक सुभाष लोंढे यांचेसह इतर पक्षाचे पाच ते सहा नगरसेवक शिवसेनेच्या वाटेवर असल्याची खात्रीलायक माहिती राजकीय सूत्रांकडून हाती आली आहे. सेनेत प्रवेश करणाऱ्यांमध्ये कॉंग्रेसह मनसे, भाजप व राष्ट्रवादीच्या नगरसेवकांचा समावेश असल्याची चर्चा आहे. 
Loading...

आगामी अहमदनगर महानगर पालिकेची निवडणूक डिसेंबर २०१८ मध्ये होणार आहे. सध्या महानगरपालिकेत शिवसेना-भाजपाची सत्ता असून शिवसेनेचा महापौर आहे. मात्र गेल्या चार-पाच वर्षात शिवसेना-भाजपामध्ये राजकीय कारणाने कायम खटके उडत आहेत. 

                 
त्यामुळे शिवसेना व भाजपाने स्वतंत्र निवडणूका लढविण्याची तयारी सुरू केली आहे. या पार्श्वभूमीवर भाजपाने सध्या आघाडी घेतली असून श्विसोनेचे नगरसेवक मनोज दुल्लम तसेच विजय बोरूडे यांनी आपल्याकडे खेचून घेतले असून त्यांची उमेदवारी निश्चित केली आहे. 

या पळवापळवीच्या राजकारणात शिवसेनाही काही मागे राहिली नाही. सेनेनेही आता आपले शस्त्र उपसले असून कॉंग्रेसचे नगरसेवक सुभाष लोंढे यांना आपल्या जाळ्यात ओढून घेतले आहे. त्याचप्रमाणे सेनेने मनसे, भाजपा आणि राष्ट्रवादीच्या गडालाही सुरुंग लावला आहे. 

मनसेचा एक, भाजपाचा एक आणि राष्ट्रवादीच्या एका नगरसेवकाला तंबूत घेतले आहे. त्याचबरोबर मनसेचे माजी शहराध्यक्ष गिरीष जाधव यांनीही सेनेची वाट धरली असल्याने सध्या तरी शिवसेनेचे पारडे जड वाटत आहे. याशिवाय काही इच्छुकांचे प्रवेश हे लांबणीवर टाकण्यात आले असून ऐनवेळी त्यांना पक्षात घेऊन उमेदवारी बहाल केली जाण्याची शक्यता सेनेच्या सुत्रांकडून वर्तविण्यात येत आहे.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.