स्वामीभक्त असल्याची बतावणी; ५० हजाराला गंडा!


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- स्वामींसाठी मदत मागणाऱ्या तीन स्वामी भक्तांनी एका दाम्पत्याला पन्नास हजाराचा गंडा घातल्याची घटना अकोले तालुक्यातील बोरी येथे घडली. याबाबतची माहिती अशी की बोरी येथील एका शेतकरी कुटुंबाकडे सकाळी भगवे वस्त्र परिधान केलेले तीन साधू आले. आम्ही स्वामी भक्त आहोत, स्वामींसाठी दानधर्म करा, मदत करा, अशी विनवणी त्यांनी या कुटुंबाकडे केली. 


Loading...
या कुटुंबातील सदस्यही स्वामींचे भक्त असल्याने त्यांनी तात्काळ या स्वामी भक्तांना दोन हजार रुपयांची मदत केली. एकदम दोन हजार रुपयाची मदत मिळालेली पाहताच त्या भामट्या स्वामी भक्तांनी मदत देणाऱ्या त्या कुटुंबाला मोहिनी घातली आणि दोन हजाराचे दुप्पट चार हजार रुपये करून देतो असे सांगित मंत्र पूजा सुरू केली.

आदल्या दिवशी भिशीच्या रूपाने जमा झालेले पैसे घरात आहेत हे पैसे दुप्पट करू या लालसेने शेतकऱ्याच्या पत्नीने घरातील ५० हजार रुपये तात्काळ साधूच्या हातावर ठेवले. भामट्या साधूंनी ५० हजाराचे एक लाख रुपये करण्याच्या बहाण्याने पती-पत्नींना पूजेत गुंतविले. 


दरम्यानच्या काळात भगवे वस्त्र परिधान केलेले तीनही साधू घराच्या बाहेर पडले आणि काही अंतरावर उभ्या केलेल्या आपल्या मोटरसायकलवर बसून त्यांनी धूम ठोकली. थोड्यावेळाने पूजा संपल्यानंतर सदर कुटुंबाला आपण फसलो गेल्याची जाणीव होताच त्यांनी आरडाओरड केला; परंतु तोपयंर्त साधू पळून गेले. स्वामी भक्तांनी मदतीचे दामदुपटी च्या बहाण्याने आपल्याला फसविल्याचे लक्षात आल्याने त्यांनी डोक्याला हात लावला.

----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.