अागामी निवडणुकीत भाजपच्या पापाची हंडी जनताच फोडणार


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- दहीहंडी उत्सवाचे निमित्त साधून काँग्रेसच्या नेत्यांनी साेमवारी सातारा जिल्ह्यातील कराडमध्ये राज्य सरकारच्या कारभाराची प्रतीकात्मक दहीहंडी फाेडून निषेध नाेंदवला. 'सरकारच्या पापाचा घडा आता भरला असून २०१९ च्या निवडणुकीत जनताच भाजपच्या पापाची हंडी फोडून सत्तेवरून खाली खेचेल,' अशी टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशाेक चव्हाण यांनी केली. 


Loading...
चाैथ्या दिवशी काँग्रेसची राज्यव्यापी जनसंघर्ष यात्रा कराडमध्ये पाेहाेचली. दिवंगत माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या 'प्रीतिसंगम' या समाधिस्थळी सर्व नेत्यांनी अभिवादन केले. त्यानंतर यात्रेत सहभागी काँग्रेस नेत्यांनी भाजप सरकारच्या भ्रष्टाचाराची हंडी फोडली. 

रहिमतपूर येथे सभेला मार्गदर्शन करताना अशाेक चव्हाण यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली. 'भाजप सरकारच्या चार वर्षांच्या सत्ताकाळात महाराष्ट्राचे वाटोळे झाले आहे. भाजपच्या चुकीच्या धोरणामुळे राज्याची अधोगती झाली आहे. चार वर्षांत घोटाळे करण्याशिवाय आणि खोटी आश्वासने देण्यापलीकडे या सरकारने काही केले नाही. 


राज्यात शेतकरी आत्महत्या करीत आहेत. बेरोजगारीला कंटाळून सुशिक्षित बेरोजगार तरुण आत्महत्या करत आहेत. आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा व इतर समाजातील तरुण आत्महत्या करत आहेत. सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्याऐवजी सरकार प्रश्न चिघळवत ठेवून समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. 


राजकीय फायद्यासाठी राज्यात सामाजिक तेढ निर्माण करण्याचे काम सत्ताधाऱ्यांकडून सुरू आहे,' असा अाराेप अशाेक चव्हाण यांनी केला. ही जनसंघर्ष यात्रा ४ सप्टेंबर रोजी सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर, मंगळवेढा, सोलापूर अक्कलकोट या शहरांत जाणार आहे.

----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.