मार्बल फरशी अंगावर पडून दोन मजूर ठार

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- बंगल्याच्या बांधकामासाठी आणलेली मार्बल फरशी ट्रकमधून उतरवत असताना फरशीचा लोड अंगावर पडून दोन मजूर मृत्यूमुखी पडले. नगर शहरातील सावेडी उपनगरातील जॉगिंग पार्कजवळ गुरुवारी दुपारी बाराच्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी तोफखाना पोलिस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.विनोद छोटेलाल सरोज (वय ३०, रा. डकवा, उत्तर प्रदेश), राज भगवानदास साकेत (वय २०, रा. रत्नगाव, मोहनगंज, मध्य प्रदेश) अशी मरण पावलेल्यांची नावे आहेत. जागिंग पार्कजवळ राहत असलेले प्रमोद चढ्ढा यांच्या बंगल्याचे बांधकाम सुरू आहे. बंगल्यासाठी गुजरात येथून एका ट्रकमधून मार्बल फरशा मागविल्या होत्या. गुरुवारी फरशा घेऊन ट्रक आल्यानंतर ट्रकमधून फरशा खाली उतरविण्यासाठी एमआयडीसी भागातून मजुरांना आणले होते.

ट्रकमध्ये लाकडे लावून ट्रकच्या दोन्ही बाजूने फरशा ठेवण्यात आल्या होत्या. या फरशा खाली उतरविण्यासाठी चार मजूर ट्रकमध्ये चढले होते. विनोद सरोज व राज साकेत या दोघांनी फरशांना लावलेली लाकडे काढली. त्याच वेळी फरशांचा पूर्ण लोड या दोघांच्या अंगावर पडला. त्यामुळे दोघेही फरशांखाली अडकले. इतर मजुरांनी दोघांना बाहेर काढून सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नेले. डॉक्टरांनी दोघांना तपासल्यानंतर मृत घोषित केले.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.