दुधाच्या खरेदी दरात दोन रुपयांनी कपात.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- राज्य सरकारने शासकीय दूध खरेदी दरात लिटरमागे दोन रुपयांनी कपात केली आहे. तसा आदेश राज्य सरकारने काढला आहे. दरम्यान, वितरकांच्या कमिशनचे टप्पे रद्द करून लिटरमागे तीन रुपये कमिशन देण्याचा आदेशही सरकारने काढला आहे. एक तारखेपासून या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे. 


दुधाच्या खरेदी दराचा अभ्यास करण्यासाठी नेमलेल्या समितीची नुकतीच बैठक झाली. सरकारी दुधाच्या खरेदी दरात सुधारणा करणे व आरे भूषण दुधाच्या दराच्या विक्रीत सुसूत्रता आणणे या दोन विषयांवर या समितीत विचार-विनिमय करण्यात आला. राज्य सरकारने सहकारी दूध संघांना दूध खरेदीचा दर 25 रुपये ठरवून दिलेला असताना सरकारी दूध खरेदीचा दर मात्र दोन रुपयांनी जास्त होता. 


Loading...
अर्थात सरकारी खरेदी अवघी तीन-साडेतीन टक्के आहे. सहकारी संघांचे दूध संकलन ही तीस टक्कयांवर आले आहे. सरकारी व सहकारी दूध संघ मिळून 34 टक्‍क्‍यांपर्यंत, तर खासगी दूध संघाचे संकलन 65 टक्के आहे. खासगी संघांना दूध खरेदीदराचे बंधन नाही. त्यांना सरकार अनुदान देत नाही. 

त्यामुळे हे दूध संघ कितीही कमी दराने दूध खरेदी करतात; परंतु आता सहकारी व खासगी दूध संघाकडे जादा भाव असल्याने खासगीकडील दूध सहकारी संघांकडे यायला लागले आहे. सहकारी व सरकारी दूध खरेदी दरात एकवाक्‍यता असावी, म्हणून आता गाईच्या दुधाला 25 रुपये व म्हशीच्या दुधाला 34 रुपये दर निश्‍चित करण्यात आला. 

गाईच्या दुधासाठी साडेतीन टक्के स्निग्धांश व साडेआठ टक्के उष्मांक, तर म्हशीच्या दुधासाठी सहा टक्के स्निग्धांश व नऊ टक्के उष्मांक असा निकष ठरविण्यात आला आहे. “आरे’ दुधाच्या विक्रीचा मुंबईचा दर 37 रुपये प्रतिलिटर तर मुंबई वगळून अन्य ठिकाणी 36 रुपये करण्यात आला आहे. यापूर्वी वितरकांना टप्पेनिहाय अडीच ते साडेतीन रुपये कमिशन दिले जात होते. आता टप्पे रद्द करण्यात आले असून सरसकट तीन रुपये कमिशन देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.