गैरव्यवहारप्रकरणी नगरसेवक कोतकरसह संचालकांचा जामीन अर्ज फेटाळला.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- केडगावमधील अंबिका पतसंस्थेतील गैरव्यवहारप्रकरणी आजी-माजी संचालकांनी केलेला अटकपूर्व जामीन अर्ज जिल्हा व सत्र न्यायालयाने फेटाळला. पतसंस्थेत २ कोटी १३ लाख ७९ हजार ९४७ रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी कोतवाली पोलिस ठाण्यात १८ जणांच्या विरुध्द गुन्हा दाखल आहे. अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्याने या आजी-माजी संचालकांना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता आहे. 
Loading...

आरोपींमध्ये पतसंस्थेचे अध्यक्ष सर्जेराव नारायण कोतकर, नगरसेवक सुनील सर्जेराव कोतकर, सलीम अहमदभाई तांबोळी, ज्ञानदेव वामनराव शिंदे, रामचंद्र सबाजी औटी, शंकर हरिभाऊ ठोंबरे, भारत जगन्नाथ पाटील, अण्णासाहेब वामन शिंदे, रमेश कोंडिबा शेरकर, शकुंतला एकनाथ पवार, राकेश संभाजी पाटील, नवनाथ आनंदा विरकर, शंकर नारायण शेळके, महादेव राजाराम बोरकर, लता रमेश शेरकर, हिरालाल सदाशिव भिंगारदिवे व मॅनेजर संतोष गोविंद पानसरे यांचा समावेश आहे. 


ठेवी परत मिळत नसल्याच्या ठेवीदारांच्या तक्रारी होत्या. संचालक व व्यवस्थापकांकडून उडवाउडवीची उत्तरे मिळत होती. ठेवीदारांच्या तक्रारींची दखल घेत लेखापरीक्षण करण्यात आले. त्यात धक्कादायक माहिती समोर आली. ठेवींच्या पावत्यांची दैनंदिन नोंद ठेवण्यात आलेली नाही, बचत खाते, दैनंदिन खाते, रिकरिंग खाते, तसेच त्या खात्यात कमी रक्कम शिल्लक असतानाही जास्त रक्कम अदा करणे, असा ठपका लेखापरीक्षणाच्या अहवालात ठेवण्यात आला. लेखापरीक्षक शिरीष कुलकर्णी यांच्या फिर्यादीनुसार पोलिसांनी १८ जणांच्या विरुध्द गुन्हा दाखल केला.

----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.