विखे पाटील संकटात ! पद्मश्री विखे कारखान्याला 71 कोटींचा तोटा.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- आशिया खंडातील पहिल्या सहकारी साखर कारखाना असणार्या पद्मश्री विखे कारखान्याच्या अहवालातून धक्कादायक माहिती पुढे आली आहे. या कारखान्यास तब्बल 71 कोटींचा तोटा झाला आहे. गणेश कारखाना चालवायला घेतल्याने त्याच्या 53 कोटींचे ओझे पद्मश्री विखे कारखान्यावर पडले आहे. सहवीजनिर्मिती प्रकल्पातूनही फारसे उत्पन्न मिळत नाही. 
Loading...

पद्मश्री विखे कारखान्याची सर्वसाधारण सभा दोन दिवसांपूर्वी झाली. मागच्या वर्षाची सर्वसाधारण सभा वेळेच्या अगोदरच गुंडाळण्यात आली होती. या वेळी मात्र विरोधी गटाचे अरुण कडू, एकनाथ घोगरे, बाळासाहेब केरू विखे यांनी सभेला उपस्थित राहून काही प्रश्‍न मांडले. त्यावरून गोंधळही झाला.


तोटयाचा बोजा पद्मश्री विखे कारखान्याच्या सभासदांवर 

कारखान्याच्या कार्यकारी संचालकांना निवेदन देऊन कारखान्याच्या गंभीर आर्थिक परिस्थितीकडे लक्ष वेधले. कारखान्याच्या अहवालातून बरीच गंभीर परिस्थिती उघड झाली. विखे कारखान्याने गणेश कारखाना चालवायला घेतल्याने त्याच्या तोटयाचा बोजा पद्मश्री विखे कारखान्याच्या सभासदांवर पडत आहे. 

गणेश कारखान्याचा 2014-15 चा तोटा नऊ कोटी 27 लाख रुपये होता. पुढच्याच वर्षी तो 14 कोटी सात लाख रुपयांवर गेला. 2016-17 मध्ये या कारखान्याचा तोटा 24 कोटी 75 लाख रुपये, तर गेल्या वर्षी 52 कोटी 52 लाख रुपये झाला. पद्मश्री विखे कारखान्याचा तोटा 19 कोटी 22 लाख रुपये झाला आहे. 


गणेश कारखान्याची 33 कोटी 33 लाखांची देणी देण्याची जबाबदारी !

पद्मश्री विखे कारखान्याला तोटा असताना गणेश कारखान्यात पद्मश्री विखे कारखान्याने नऊ कोटी 29 लाख 51 हजार रुपयांची गुंतवणूक केली आहे. तोटयाबरोबरच गणेश कारखान्याची 33 कोटी 33 लाखांची देणी देण्याची जबाबदारी पद्मश्री विखे कारखान्यावर आहे. 

विखे कारखान्याने मात्र सहवीजनिर्मिती प्रकल्प  दिला चालवायला !

एकीकडे जिल्ह्यातील अन्य कारखान्यांनी सहवीजनिर्मिती प्रकल्पातून वीजनिर्मिती करून तिची विक्री केली; परंतु अन्य कारखाने चालवायला घेणाऱ्या पद्मश्री विखे कारखान्याने मात्र सहवीजनिर्मिती प्रकल्प चालवायला दिला, या विरोधाभासाकडे कडू यांनी लक्ष वेधले. पद्मश्री विखे कारखान्याने गॅमन इंडियाला हा प्रकल्प चालवायला दिला. 

पद्मश्री विखे कारखान्यावर 264 कोटी 28 लाखांचे कर्ज, 273 कोटी 44 लाखांची रक्कम इतर देणे, 35 कोटी 48 लाखांचे कर्जावरचे व्याज, 71 कोटी 74 लाखांचा तोटा, तीन कोटी 53 लाखांचा कर्मचारी बोनस देणी, 65 कोटी 47 लाखांचे ऊस बील देणे, 22 कोटी 75 लाखांचा मूल्यवर्धित कर देणे, ऊसतोड व वाहतुकीचे 15 कोटी 13 लाखांचे देणे, कामगारांची 15 कोटींची मजुरी आदी तपशील देऊन कारखान्याची आर्थिक स्थिती त्यावरून समजून यायला हरकत नाही, असे त्यांनी म्हटले आहे. 

----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.