....आणि भर सभेत सुजय विखे यांचे भाषण रोखले !


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- पद्मश्री विखे कारखान्याच्या सर्वसाधारण सभेत कारखान्याचे अध्यक्ष सुजय विखे यांचे भाषण जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष व कारखान्याचे सभासद अरुण कडू यांनी रोखले. मुद्यांवर बोलण्याचा आग्रह त्यांनी धरला. व्यवस्थित उत्तरे मिळत नसल्याने कडू यांच्यासह अन्य सभासदांनी सभात्याग केला. या कारखान्याची सभा सुजय विखे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्या वेळी अहवालाचाच आधार घेऊन कडू यांनी पद्मश्री विखे कारखान्याच्या गैरकारभारावर टीका केली. 
Loading...

विखे कारखान्याचा चुकीचा कारभार, अन्य कारखान्यांची गळयात घातलेली लोढणी यावरून पद्मश्री विखे कारखान्याच्याच सभासदांचे कसे नुकसान होत आहे, हे त्यांनी आकडेवारीनिशी सांगितले. त्यांनी कार्यकारी संचालकांना निवेदन दिले. कडू यांच्यासह बाळासाहेब केरूनाथ विखे, एकनाथ घोगरे आदी या वेळी उपस्थित होते. खरे तर कडू यांनी उपस्थित केलेल्या मुद्यांना उत्तर देऊन त्यांना निरुत्तर करण्याची संधी सुजय विखे यांना होती; परंतु त्यांनी ती डावलली. 

विखे कारखान्याच्या सर्वसाधारण सभेत प्रथमच विरोधकांनी मुद्देसूद मुद्दे मांडले. सुजय विखे यांनी विरोधकांवर आक्रमक भाषेत टीका केली. त्यांच्या भाषणाला कडू व अन्य सभासदांनी हरकत घेतली. आपण उपस्थित केलेल्या मुद्‌द्‌यांना उत्तर द्या, राजकीय भाषण नको, असंबद्ध बोलू नका, असे कडू यांनी त्यांना सांगितले. सुजय विखे यांचे भाषण रोखल्याने सभासदांत चलबिचल सुरू झाली. 

त्यानंतर कडू, बबनराव कडू, ज्ञानदेव तांबे, नितीन खर्डे, विलास मुंदडा आदींनी सभात्याग केला. सुजय विखे यांनी नंतर भाषण केले नाही. विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील व माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के यांची या वेळी भाषणे झाली. कारखान्याचा अहवाल सात दिवस अगोदर मिळायला हवा. सभासदांना त्यामुळे अभ्यास करता येतो; परंतु पद्मश्री विखे कारखान्याने अहवाल उशिरा दिल्याचा आरोप कडू यांच्यासह अन्य सभासदांनी केला.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.