आमदार कर्डिले व विरोधकांमध्ये वादावादी व हमरीतुमरी


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- जुनी इमारत पाडण्याच्या मुद्यावरून नगर तालुका खरेदी विक्री संघाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत सत्ताधारी व विरोधकांमध्ये चांगलीच वादावादी व हमरीतुमरी झाली. विरोधी गटाच्या आक्षेपाला झुगारून देत इमारत पाडण्याचा ठराव बहुमताने मंजूर केला असल्याची माहिती सभापती रोहिदास मगर यांनी दिली.

तालुका खरेदी विक्री संघाच्या सभागृहात शनिवारी (२२ सप्टेंबर) संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा झाली. संस्थेच्या इतिहासात वार्षिक सभेत पहिल्यांदाच वादळी चर्चा झाल्याचे जुन्या सभासदांनी सांगितले. सत्ताधारी मंडळाचे नेते आमदार शिवाजी कर्डिले, चेअरमन रोहिदास मगर, उद्धव अमृते, बाजार समितीचे सभापती विलास शिंदे, संचालक दिलीप भालसिग, संदीप कर्डिले यांच्यासह कर्डिले समर्थक उपस्थित होते. 

Loading...

विरोधी गटाकडून जिल्हा परिषद सदस्य संदेश कार्ले, प्रताप शेळके, शरद झोडगे, माजी जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब हराळ, युवा नेते प्रविण कोकाटे, पंचायत समिती सदस्य रवी भापकर, व्ही. डी. काळे, गुलाब शिंदे आदी उपस्थित होते.

सभा सुरू झाल्यानंतर संदेश कार्ले, बाळासाहेब हराळ, प्रताप शेळके यांनी तालुका खरेदी विक्री संघाची जुनी इमारत पाडण्याचा व त्या ठिकाणी असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटविण्याच्या विषयास विरोध केला. विरोधकांच्या आक्रमणाला सत्ताधारी मंडळाकडून सभापती मगर, संदीप कर्डिले, दिलीप भालसिंग, अमृते यांनी प्रतिकार केला. 

कार्ले म्हणाले की, 'सरकारच्या निधीतून झालेली ही इमारत पाडण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून परवानगी घेतली का?, इमारतीच्या आवारात असलेला छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा हलवू नये. इमारतीतील गाळेधारकांचे डिपॉझिट कसे परत करणार असे प्रश्न उपस्थित केले. 

विरोधी गटाचे कार्ले, हराळ, शेळके हे उभे राहून बोलत असताना सत्ताधारी मंडळही त्यांना प्रत्युत्तर देत होते. या वेळी वातावरण तणावपूर्ण झाले होते. याबाबत आमदार कर्डिले, सभापती मगर यांनी सांगितले की, 'सदरची इमारत १९६४ साली बांधली असल्याने जुनी झाली आहे. 

सध्या या इमारतीच्या गाळेधारकांच्या भाड्यापोटी ५६ हजार रुपये भाडे मिळते. व्यापाऱ्यांच्या मागणीवरूनच तांत्रिक बाबींची पुर्तता करून ती पाडली जाणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा हलविणार नसल्याचे त्यांनी सांगितले.
----------------------------

अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.