व्यापाऱ्यास मारहाण करणारे ५ जण ताब्यात

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- तारकपुर येथील व्यापारी हुंदराजमल मटलाई यांना ५ सप्टेंबर रोजी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास अज्ञात ८ इसमांनी मारहाण करून त्यांच्या गळ्यातील दोन तोळे वजनाची सोन्याची चैन बळजबरी चोरून नेली होती. याप्रकरणी तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. यातील ५ आरोपींना ताब्यात घेण्याची कारवाई तोफखाना पोलिसांनी केली आहे. तोफखाना पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संपत शिंदे व त्यांच्या पथकाने या प्रकरणाचा तपास केला असता या गुन्ह्यातील आरोपी रुषभ भंडारी याने मटलाई यांचा पुतण्या जतीन मटलाई यास सुमारे २८ लाख रुपये व्याजाने दिले होते. जतीन हा दिवाळखोर झाल्याने रुषभ भंडारी याचे पैसे देण्यास तो असमर्थ होता. 

Loading...

सदरचे पैसे वसुल करण्यासाठी रुषभ हा जतीन यांच्या कुटुंबास धमकावू लागला. धमकावून देखील पैसे मिळत नसल्याने रुषभ याने जतीन मटलाई याचे चुलते हुंदराजमल मटलाई यास मारहाण करण्याचा कट रचला. त्यावरून रुषभ भंडारी याने गुन्ह्यातील ८ साथीदारांना हुंदराजमल मटलाई यांना मारहाण करण्याची सुपारी दिली. 


यातील आरोपींनी मटलाई यांच्या जाण्या-येण्याची २ दिवस पाहणी केली व ५ सप्टेंबर रोजी रात्री ९ वाजेच्या सुमारास त्यांना तारकपूर रोडवर लाकडी दांडक्यांनी जबर मारहाण केली. या मारहाणीत फिर्यादीची दोन तोळे वजनाची सोन्याची चैन बळजबरी चोरून नेली आहे. पोलिसांनी वृषभ भंडारीसह ५ आरोपींना ताब्यात घेतले आहे. 

----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.