स्वाईन फ्ल्यूच्या मुकाबल्यासाठी प्रशासन सज्ज ,नागरिकांनी घाबरुन न जाता आवश्यक ती काळजी घ्यावी- जिल्हाधिकारी द्विवेदी


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- जिल्ह्याच्या काही भागात स्वाईन फ्ल्यूचा प्रादुर्भाव जाणवला असला तरी नागरिकांनी घाबरुन जाण्याचे कारण नाही. स्वाईन फ्ल्यूच्या मुकाबल्यासाठी जिल्हा प्रशासन आणि आरोग्य यंत्रणा सज्ज असून नागरिकांनी प्रादुर्भाव होऊ नये, यासाठी योग्य काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी केले.
Loading...

येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन समिती सभागृहात आज (शुक्रवारी) अहमदनगर महापालिका आणि आरोग्य विभागाच्या वतीने इन्फ्लुएंझा ए (एच1एन1) स्वाईन फ्ल्यू संदर्भात प्रतिबंधात्मक उपाययोजना आणि प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी जिल्हाधिकारी श्री. द्विवेदी बोलत होते. यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संदीप सांगळे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. बापूसाहेब गाडे, महापालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. अनिल बोरगे, शहरातील प्रसिद्ध वैद्यकीय तज्ज्ञ डॉ. एस.एस. दीपक, इंडियन मेडिकल असोसिएशनचे नगर शहर अध्यक्ष डॉ. मिश्रा, डॉ. नागरगोजे आदींची यावेळी उपस्थिती होती.

यावेळी जिल्हाधिकारी द्विवेदी म्हणाले, पावसाळ्यात साथरोगाचे प्रमाण वाढते. त्याचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी आपण प्रत्येकाने काळजी घेतली पाहिजे. साथरोग बळावू नये, म्हणून काय करावे आणि काय करु नये, हे प्रत्येकाने लक्षात घेतले पाहिजे. जिल्ह्यात मागील काही दिवसांत संगमनेर आणि कोपरगाव येथे स्वाईन फ्ल्यूच्या प्रादुर्भावामुळे चौघांचा मृत्यू झाला आहे. प्रतिबंधात्मक उपाय म्हणून सर्वांनी काळजी घेण्याचे आवाहन त्यांनी केले.

जिल्ह्यातील खासगी आरोग्य यंत्रणा, वैद्यकीय संघटना यांनी त्यासाठी तालुका, गावपातळीवर मोठ्या प्रमाणात जनजागृती करावी, सर्व प्रशासकीय यंत्रणा त्यांना याकामी संपूर्ण सहकार्य करेल, असे त्यांनी स्पष्ट केले. नागरिकांच्या मनांत साथरोगाविषयी भीती आहे, डॉक्टरांनी योग्य मार्गदर्शन करुन ही भीती कमी करावी. स्वाईन फ्ल्यूची लक्षणे आढळल्यास रुग्णावर तात्काळ उपचार करावेत, इतरांनी काय काळजी घ्यावी, याचे मार्गदर्शन करावे, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.

स्वाईन फ्ल्यूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी ज्या उपाययोजना करावयाच्या आहेत, त्याची माहिती सर्वांपर्यंत पोहोचण्यासाठी इंडियन मेडिकल असोसिएशन आणि इतर वैद्यक संघटनांनी गाव व तालुका पातळीवरही काम करावे, असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी डॉ. दीपक यांनी, स्वाईन फ्ल्यू होऊ नये, यासाठी काय दक्षता घ्यावी, याची माहिती दिली. स्वाईन फ्ल्यू हा विषाणू मुळे होणारा आजार आहे. हा विषाणू हवेद्वारे पसरतो. याचा संसर्ग बाधित व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीला होतो. या आजाराचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी वैयक्तिक आणि सार्वजनिक स्वच्छता अतिशय महत्वाची असल्याचे त्यांनी सांगितले. याशिवाय, प्रत्येकाने सातत्याने हात साबण व पाण्याने धुवावेत, खोकताना व शिंकताना तोंडाला रुमाल वापरावा, भरपूर पाणी प्यावे, अतिगर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे आणि गेल्यास नाकाला घडी केलेला रुमाल बांधावा, भरपूर पाणी प्यावे, आणि पुरेसा आहार घ्यावा, असे आवाहन केले. कोणत्याही नागरिकाला तीव्र घसादुखी, घशाला सूज, ताप 38 अंश सेल्सीअसपेक्षा जास्त असेल, अंगदुखी, डोकेदुखी, जुलाब, उलट्या आदी लक्षणे जाणवत असतील तर त्यांनी तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा आणि औषधोपचार करुन घ्यावेत, असे डॉ. दीपक यांनी सांगितले. स्वाईन फ्ल्यू आजारावर ऑसेलटॅमीवीर हे औषध परिणामकारक असल्याचे सांगून डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कोणतीही औषधे घेवू नये, असेही त्यांनी सांगितले.

डॉ. सांगळे यांनी यावेळी स्वाईन फ्ल्यू आजारासंबंधी उपचाराबाबतच्या उपस्थितांच्या शंकांना उत्तरे दिली तसेच गोवर आणि रुबेला लसीकरणासंदर्भात येत्या नोव्हेंबरपासून सुरु होणाऱ्या मोहिमेबाबतही सर्वांना माहिती दिली.कार्यक्रमाचे नियोजन डॉ. बोरगे यांनी केले तर आभार डॉ. नागरगोजे यांनी मानले.

----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.