शेतकऱ्याचा बिबट्याने केला पाठलाग !


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील आंबीखालसा परिसरातील जोठेवाडी येथे शेतातील पिकाला पाणी भरण्यासाठी गेलेल्या बाळासाहेब कसबे या शेतकऱ्याचा बिबट्याने पाठलाग केल्याची घटना गुरुवार दि.२० सप्टेंबर रोजी पहाटे साडे तीन वाजेच्या सुमारास घडली. त्यामुळे याठिकाणी वनविभागाने पिंजरा लावावा अशी मागणी उपसरपंच सुरेश कान्होरे, तुकाराम कसबे आदी शेतकऱ्यांनी केली आहे. 


Loading...
याबाबत माहिती अशी की, बाळासाहेब कसबे हे गुरुवारी पहाटे साडे तीन वाजेच्या सुमारास शेतातील पिकाला पाणी भरण्यासाठी गेले होते. त्याचवेळी त्या ठिकाणी त्यांनी बिबट्याला पाहिले. त्यामुळे त्यांची चांगलीच तारंबळ उडाली. बिबट्या आपल्याकडे येऊ लागल्याने त्यांनी जवळील बॅटरीचा प्रकाश बिबट्याच्या डोळ्यावर चमकवल्याने बिबट्या जागेवरच स्थिर झाला. 

कसबे हे घाबरल्याने त्यांनी हळूहळू घराच्या दिशेने जाण्यास सुरुवात केली. पण बिबट्याही त्यांच्याच पाठिमागे येत होता. कसबे यांनी बॅटरीचा प्रकाश बिबट्याकडेच लावून धरला. घराजवळ गेले असता त्याच वेळी कसबे हे घरात शिरले आणि त्यांनी दरवाजा लावून घेतला.  काही वेळाने दरवाजा उघडला असता तर समोर काही अंतरावरच बिबट्या बसलेला दिसला. 


त्यामुळे त्यांनी फटाके वाजवले व बिबट्याने धूम ठोकली. या परिसरात बिबट्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्याने शेतकऱ्यांचे रात्रीच्या वेळी घराबाहेर पडणे सुद्धा अवघड झाले आहे. कधी कधी दिवसा ढवळ्याही बिबट्याचे दर्शन होत आहे. बिबट्यांना जेरबंद होण्यासाठी वनविभागाने त्वरीत याठिकाणी पिंजरा लावावा अशी मागणी उपसरपंच सुरेश कान्होरे, तुकाराम कसबे यांच्यासह परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे.

----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.