नगर जिल्ह्यात स्वाईन फ्लूने तिघांचा बळी


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- प्रसूतीसाठी माहेरी जामखेड येथे आलेल्या रुचिरा प्रवीण वाघमारे (वय २६, हल्ली शिक्षक कॉलनी, जामखेड) व दादासाहेब विश्वनाथ राळेभात (वय ५८, मोरे वस्ती) या दोघांचा स्वाइन फ्लूने पुण्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला. 
Loading...

मागील काही दिवसांपासून तालुक्यात स्वाइन फ्लूसदृश अाजाराने थैमान घातले अाहे. बीड येथून माहेरी प्रसूतीसाठी आलेल्या रुचिरा वाघमारे हिला काही दिवसांपूर्वी सर्दी व खोकल्याचा त्रास होऊ लागला. नंतर तिला निमोनियाची लागण झाली. अाजार वाढल्याने वडिलांनी तिला नगर येथील रूग्णालयात दाखल केले. 

तपासण्या केल्या असता डॉक्टरांनी स्वाइन फ्लू झाला असल्याचे सांगितले. त्यामुळे पुढील उपचारांसाठी तातडीने पुण्याला हलवण्यात आले. सात दिवसांपूर्वी प्रसुती होऊन रुचिरास मुलगी झाली. मात्र, नंतर अाजार वाढल्यामुळे १८ रोजी रात्री साडेदहा वाजता रूचिराचा स्वाइन फ्लूने मृत्यू झाला. रुचिरास आधी नूतन ही साडेतीन वर्षांची मुलगी अाहे. 

दुसऱ्या घटनेत दादासाहेब विश्वनाथ राळेभात यांना आठ दिवसांपूर्वी सर्दी, खोकला व ताप येऊ लागल्याने त्यांना जामखेड येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. अाजाराची लक्षणे वेगळी दिसल्याने पुढील उपचारासाठी त्यांना नगर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. 

नगर येथील डॉक्टरांनी राळेभात यांची तपासणी केली असता त्यांना स्वाइन फ्लू झाल्याचे निष्पन्न झाले. नातेवाईकांनी तातडीने दादासाहेबांना पुण्याला हलवले. तेथे उपचारांदरम्यान १९ सप्टेंबरला सायंकाळी त्यांचा मृत्यू झाला. स्वाइन फ्लूबाबत दोघांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याची माहिती नातेवाईकांनी दिली. दोघांचाही एका दिवसांच्या फरकाने मृत्यू झाला.

कर्जत तालुक्यातील नागलवाडी ग्रामपंचायतीचे माजी सरपंच अशोक सखाराम डाडर (वय ६२) यांचा दि.19 रोजी रात्री ८ वाजेच्यादरम्यान स्वाईन फ्लूच्या आजाराने मृत्यू झाला. प्रा. अशोक डाडर हे गेल्या दोन महिन्यांपासून पुणे येथे आपल्या मुलांकडे राहायला गेले होते. त्यांना मागील दहा-पंधरा दिवसांपूर्वी त्रास होऊ लागल्याने पुणे येथील के. एम. हॉस्पिटलमध्ये उपचारार्थ दाखल करण्यात आले होते. 

प्राथमिक उपचारात त्यांना निमोणिया झाल्याचे सांगण्यात आले. मात्र,आजाराचे निदान होत नसल्याने त्यांची प्रकृती अधिकच खालावल्याने त्यांचा बुधवारी रात्री के.एम. हॉस्पिटल (पुणे) येथे मृत्यू झाला. प्रा. डाडर यांच्या आजाराचे निदान करण्यासाठी करण्यात आलेल्या तपासण्यांमध्ये त्यांना स्वाईन फ्लू आजाराची लागण झाली असल्याचे समजले. 
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.