पोलीस ठाण्याच्या इमारतीसाठी जागा मिळेना,५ कोटी रुपयांचा निधी पडून.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील घारगाव येथे नवीन पोलीस ठाण्याची इमारत व निवासस्थाने बांधण्यासाठी कोणी जागा देता का जागा, अशी म्हणण्याची वेळ पोलीस व महसूल विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांवर आली आहे. पोलीस ठाण्याच्या इमारतीसाठी एक ते दोन वर्षांपासून चार कोटी ९५ लाख रुपयांचा निधीही पडून आहे.पुणे- नाशिक राष्ट्रीय महामार्गालगतच घारगाव आहे. पठार भागाचा केंद्रबिंदू म्हणूनही घारगावकडे पाहिले जाते. त्यामुळे विविध कामांसाठी लोक येथे येत असतात. 


Loading...
याठिकाणी पोलीस ठाणे झाले पाहिजे, अशी मागणी घारगाव ग्रामस्थांची अनेक वर्षांपासून होती. पाठपुरावा केल्यानंतर घारगावला पोलीस ठाणे मंजूर झाले. त्यासाठी ४ कोटी ९५ लाख रुपयांचा निधीही मंजूर झाला; पण ग्रामस्थांनी दिलेली जागा वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना योग्य वाटत नाही.नवीन इमारतीसाठी महामार्गालगत दोन एकराच्या वर जागा लागत असल्याचे पोलीस सांगत आहेत. 

पाच ते सहा दिवसांपूर्वीच उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक थोरात, प्रांताधिकारी भागवत डोईफोडे, तहसीलदार साहेबराव सोनवणे व पोलीस निरीक्षक अंबादास भुसारे यांनी घारगाव व अकलापूर शिवारात जागेची पाहाणी केली; पण त्या ठिकाणच्या दोन्ही जागा त्यांना आवडल्या नाहीत. आत्तापर्यंत अनेक वेळा जागांची पाहाणी करण्यात आली, तरीही काहीच उपयोग झाला नाही.


घारगाव याठिकाणी पुणे- नाशिक राष्ट्रीय महामार्गालगत एवढी मोठी जागाही उपलब्ध नसल्याचे ग्रामस्थ सांगत आहेत. त्यामुळे वरिष्ठ पोलीस अधिकारीही हतबल झाले आहेत. तर एवढी मोठी जागा कुठे उपलब्ध करुन द्यायची? असा प्रश्न ग्रामस्थांपुढे निर्माण झाला आहे. घारगाव पोलिस स्टेशन अंतर्गत एकूण ४८ गावे येतात. काही गावे दहा ते पंधरा किलोमीटर अंतरावरही आहेत आणि लोकसंख्याही भरपूर आहे. 


त्या अनुषंगाने पोलिस स्टेशन मंजूर झाले आहे. पण जागेचा प्रश्न काही निकाली लागेना. त्यामुळे आता वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी आंबीखालसा व डोळासणे येथे महामार्गालगत जागा पाहाण्यास सुरुवात केली आहे.मार्च महिन्याच्या अगोदर पोलिस स्टेशन व पोलिसांचे निवासस्थाने होणे गरजेचे आहे. पण तसे न झाल्यास मंजूर झालेला ४ कोटी ९५ लाख रुपयांचा निधी मागे तर जाणार नाहीना? असा प्रश्नही आता निर्माण झाला आहे.

----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.