घारगाव व आंबीखालसा परिसरात बिबट्यांचा धुमाकूळ.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- संगमनेर तालुक्यातील घारगाव येथे भक्ष्याच्या शोधात बिबट्या आता गावात येऊ लागला आहे. तर आंबीखालसा परिसरातही बिबट्याने धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे बिबट्यांच्या दहशतीमुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून घराबाहेर पडणेसुद्धा अवघड झाले आहे. त्यामुळे वनविभागाने दोन्ही ठिकाणी पिंजरे लावावेत, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. 


Loading...
काही दिवसांपासून बिबट्या थेट घारगावात येत आहे. अनेकांना रात्रीच्या व पहाटेच्या वेळी बिबट्याचे दर्शन झाले आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे. आठ दिवसांपूर्वीच गावातील जगन्नाथ कचेश्वर धात्रक यांच्या घराजवळ बिबट्या आला होता. पण त्यांनी फटाके वाजून त्याला पिटाळून लावले. तसेच हॉटेल जय मल्हारचे मालक हरिदास यादवराव आहेर यांच्याही घराजवळ बिबट्या आला होता. 

त्यावेळी बिबट्याने कुत्र्यावर हल्ला केला. घरातील लोकांना आरडाओरड केल्याने त्याने धूम ठोकली.आंबीखालसा परिसरातही बिबट्याने धुमाकूळ घातला आहे. दोन ते तीन दिवसांपूर्वी आंबीखालसा शिवारातील गणपीरदरा रोडवर निर्मला विठ्ठल गाडेकर यांच्यासह महिलांनी बिबट्या सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास बघितला होता. त्यांनी आरडाओरड केल्यानंतर बिबट्याने धूम ठोकली. 


परिसरातीलच सुभाष ढमढेरे यांच्याही घरामधील स्वयंपाक घरात बिबट्या मांजरीचा पाठलाग करत घुसला होता. बिबट्यांच्या दहशतीमुळे शेतकऱ्यांचे रात्रीच्या वेळी घराबाहेर पडणेसुद्धा अवघड झाले आहे. घारगाव व आंबीखालसा परिसरात बिबट्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली असल्याची शेतकरी सांगत आहेत. 


जंगलामध्ये बिबट्यांना खाण्यासाठी भक्ष्य मिळत नसल्याने हे बिबटे आता थेट गावांमध्ये येऊ लागले आहेत. लहान- लहान मुले घराच्या आजूबाजूला खेळत असतात. अशा वेळी बिबट्याने त्यांच्यावर हल्ला केला तर याला कोण जबाबदार असणार आहे? असा प्रश्नही आता निर्माण झाला आहे. 


त्यामुळे या बिबट्यांना जेरबंद होण्यासाठी वनविभागाने त्वरीत याठिकाणी पिंजरे लावावेत, अशी मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस बाळासाहेब ढोले, माजी सरपंच सर्जेराव ढमढेरे, सामाजिक कार्यकर्ते सुरेश गाडेकर, दिपकराव ढमढेरे यांच्यासह ग्रामस्थांनी केली आहे.

----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.