धर्मा पाटलांच्या मृत्यूच्या चौकशी अहवालाला इतका विलंब का ?- आ.थोरात


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- धुळे जिल्ह्यातील विखारण गावचे ८० वर्षे वयाचे शेतकरी धर्मा पाटील यांनी मंत्रालयाच्या समोर विष पिऊन आत्महत्या केली. त्या घटनेला आता आठ महिने झाले. त्यांच्या मृत्यूच्या चौकशी अहवालाला इतका विलंब का? याची चौकशी करायलाही दुसरा चौकशी आयोग नेमावा लागणार की काय? असे प्रश्न आता निर्माण होत असल्याची टिका आ.बाळासाहेब थोरात यांनी केले.


Loading...
आ. थोरात पुढे म्हणाले महाजनको या वीज निर्मिती कंपनीसाठी सरकारने धर्मा पाटील यांची ५ हेक्टर जागा संपादित केली. त्यात ६५० आंब्याची झाडे,एक विहीर,एक बोअरवेल आणि ठिबक सिंचनाची पाईपलाईन होती. सरकारकडून त्यांना ४ लाख ३ हजार रुपये मिळाले. त्यांच्या शेजारच्या शेतकऱ्यांना मात्र १ कोटी ८ लाख आणि ४ कोटी रुपये मिळाले. 

धर्मा पाटलांवर अन्याय व्हायचं एकमेव कारण म्हणजे सरकारी अधिकाऱ्यांशी संगनमत असलेल्या दलालामार्फत आपली जमीन विकायला ते तयार झाले नाहीत. सध्याच्या 'पारदर्शक' भाजपा सरकारातील भ्रष्ट अधिकारी आणि त्यांचे दलाल यांनी त्यांच्यावर सूड उगवला. आपल्याला रास्त भाव मिळाला नाही तर आपण आत्महत्या करु असा इशारा धर्माने विभागीय आयुक्तांना दिला होता. 


पण एका सामान्य शेतकऱ्याच्या जिवाची कुणाला पर्वा वाटली नाही. धर्मा यांनी आत्महत्या केल्यानंतर दोन महिन्यांनी ६ एप्रिलला न्यायालयीन चौकशी नेमली. न्या. शाम दरणे यांना मासिक दोन लाख रुपये मानधनावर त्यासाठी नेमण्यात आले. या सर्व प्रकारातील भ्रष्टाचार त्यांनी तीन महिन्यातच शोधायला हवा होता. चौकशीची मुदत ६ जुलैला संपली. 


ती आणखी ५ ऑगस्टपर्यंत वाढवण्यात आली. चौकशीचं कामकाज मुळातच उशीरा सुरु झालं, असं कारण मुदतवाढ देताना सांगितलं गेलं. 'अहवाल तयार आहे. तो आता कधीही सादर करु ' असं १४ ऑगस्टला शासनातर्फे सांगण्यात आलं. पण अद्यापही त्याचा पत्ता नाही. धर्मा पाटील यांनी दोंडाईचा पोलिस ठाण्यात तेरा जणांविरुद्ध तक्रार नोंदवण्याचा प्रयत्न केला होता. 


त्यात दहा सरकारी अधिकारी, महाजेनकोचे दोन अधिकारी आणि एक जमिनीचा दलाल आहे. पोलिसांनी साधा एफ.आय.आर सुद्धा केलेला नाही. . धर्मा यांचा मुलगा नरेंद्र याला तात्पुरती भरपाई सरकारने देऊ केली होती. त्याने ती नाकारली. मला आता भीक नको, न्याय हवा, ही त्याची मागणी आहे. 


ती मिळेपर्यंत त्याने आपल्या वडिलांवर शेवटचे संस्कार करणार नाही असा निर्धार केला आहे. धर्मा पाटील यांचा आत्मा आपल्याला न्याय मिळेल या आशेने अजून मंत्रालयाभोवतीच घुटमळत असुन मुख्यमंत्री फडणवीस यांच्या गाडीकडे ती येता जाता तो आशेने पहात असेल,अशी उपरोधिक टीकाही त्यांनी शेवटी केली.

----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.