श्रीरामपूर पोलिसांना आव्हान महिलांच्या टोळीचे !


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- आठवडाभरापूर्वी स्टेट बँकेच्या एटीएममधून ९६ हजार रूपयांची चोरी झाल्याची घटना ताजी असतानाच काल (दि. ३१) दुपारी बारा वाजेच्या सुमारास शिवाजी रस्त्यावरील बडोदा बँकेच्या एटीएममधून एका पेन्शनर महिलेच्या पर्समधून ५० हजार रूपये हातोहात लांबविण्यात आले.या वाढत्या घटनांमुळे श्रीरामपुरातील एटीएम सुरक्षित नसल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले असून सलग दुसऱ्यांदा महिलांनी चोरी करत पोलिसांच्या मर्यादा स्पष्ट केल्या आहेत.  


Loading...
विमल अरविंद सुरडकर (वय ५८) या सध्या पुण्याला स्थायिक आहेत. नातवाची फी भरायची असल्याने त्या श्रीरामपूर येथील बडोदा बँकेत पैसे काढण्यासाठी आल्या होत्या. पावणे बाराच्या सुमारास त्या बँकेत पैसे काढण्याच्या रांगेत उभ्या होत्या. ११.५६ वाजता त्यांनी पैसे काढले. त्यानंतर त्या पासबुक प्रिंट करण्यासाठी एटीएम कक्षात गेल्या. याचवेळी बँकेच्या रांगेतून पैसे काढणाऱ्या व्यक्तींवर एक पिवळ्या रंगाचा पंजाबी ड्रेस घातलेली महिला लक्ष ठेवून होती. 

सुरडकर या बँकेतून बाहेर पडल्यानंतर तात्काळ ही महिला उठून दरवाजाजवळ आली. तेथे थोडी घुटमळल्यानंतर तिने 'हात की सफाई' दाखविली. मात्र, सुरडकर यांच्या हे लक्षात आले नाही. पासबुक पिं्रट केल्यानंतर त्या शिवाजी रस्त्याजवळील नातेवाईकाच्या दुकानात व पुढे ममता स्वीटमध्ये गेल्या. याठिकाणी पर्समध्ये हात घातला असता पैसे नसल्याचे लक्षात आले. लागलीच त्या पुतण्याकडे आल्या. त्या सर्व घटना सांगितले. त्यानंतर दोघेही बँकेत आले. मात्र, तोपर्यंत बराच उशिर झाला होता. 


बँकेतील सीसीटिव्ही फुटेज तपासले असता एक पंजाबी ड्रेस घातलेली महिला दिसून आली. पोलिसांनाही पाचारण करण्यात आले. त्यांनी सीसीटीव्हीतील महिलेवर संशय व्यक्त केला. दरम्यान, ही महिला स्टेट बँकेच्या चोरीतही असल्याचे मागील सीसीटीव्ही फुटेजमध्ये आढळून आले. 


त्यावेळी तिने निळ्या रंगाचा ड्रेस परिधान केलेला होता. एटीएमचे फुटेज उपलब्ध नसल्याने ते मिळण्यासाठी सुरडकर यांच्या नातेवाईकांनी बॅँकेत अर्ज दिला आहे. हे फुटेज मिळाल्यानंतर तिच्यासमवेत अन्य कोण होते याचाही छडा लागू शकतो. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.