अल्पवयीन मुलीवरील अत्याचाराच्या निषेधार्थ आज नगर शहर बंद.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- अल्पवयीन मुलीवरील अत्याचाराच्या निषेधार्थ सोमवारी नगर शहर बंदची हाक देण्यात आली आहे. त्याचबरोबर जिल्हाधिकारी कार्यालयावर दुपारी १२ वाजता गांधी मैदान येथून मूकमाेर्चा काढण्यात येणार आहे. गांधी मैदान येथे रविवारी दुपारी ४ वाजता नागरिकांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. 

चितळे रस्ता परिसरात राहणाऱ्या दहा वर्षांच्या मुलीला उचलून नेत घराच्या छतावर तिच्यावर अत्याचार करण्यात आले. ही घटना शनिवारी रात्री उघडकीस आली. याप्रकरणी तोफखाना पोलिस ठाण्यात आरोपी व त्याच्या आईविरुध्द गुन्हा दाखल केला आहे. Loading...
अफसर लतिफ सय्यद (२४, चितळे रस्ता परिसर) असे आरोपीचे नाव असून न्यायालयाने त्याला आठ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. आरोपीने पीडितेवर वारंवार अत्याचार केले. यासंदर्भात कुणाला काही सांगितले, तर तुला जीवे मारून टाकेन, अशी धमकी त्याने दिली होती. ३० ऑगस्टला त्याने पीडितेवर बलात्कार केला. 

त्यानंतर तीन-चार दिवसांपूर्वी त्याने तिच्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. या सर्व प्रकाराची माहिती आरोपीच्या आईला होती. शनिवारी सायंकाळी पीडित मुलीच्या पोटात दुखायला लागले. तिच्या मावशीने विचारले असता तिने आरोपीने केलेल्या दुष्कृत्याची माहिती दिली, तेव्हा हा प्रकार समोर आला. 


या घटनेचा शहरात तीव्र निषेध नोंदवण्यात आला. मुस्लिम समाजाच्या वतीने आरोपीच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन करत घटनेचा निषेध नोंदवण्यात आला. त्याचबरोबर आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी, त्याला मदत करणाऱ्यांना सहआरोपी करावे, गुन्ह्याचा तपास सीआयडीकडे द्यावा, खटला लढवण्यासाठी वकिलाची नियुक्ती करावी, पीडित मुलीच्या कुटुंबाला तातडीने पाच लाख रुपयांची मदत द्यावी आदी मागण्यांसाठी सोमवारी नगर शहर बंदची हाक देण्यात आली आहे.

----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.