मनपाच्या रक्तविघटन प्रयोगशाळेचे लोकार्पण; सत्ताधारी शिवसेनेसह राष्ट्रवादीचा बहिष्कार


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- पालकमंत्री राम शिंदे यांच्या हस्ते आज मनपाच्या बाळासाहेब देशपांडे रुग्णालयातील रक्तविघटन प्रयोगशाळेचे लोकार्पण झाले. या कार्यक्रमावर सत्ताधारी शिवसेनेसह राष्ट्रवादी कॉंग्रेसने बहिष्कार टाकला, महापौर सुरेखा कदम, उपमहापौर अनिल बोरूडे यांच्यासह शिवसेनेच्या नगरसेवकांनी कार्यक्रमाकडे पाठ फिरविली. 


Loading...
आमदार संग्राम जगतापही या कार्यक्रमात हजर नव्हते. पालकमंत्री राम शिंदे, खासदार दिलीप गांधी, स्थायीचे सभापती बाबासाहेब वाकळे यांच्यासह भाजप नगरसेवकांची उपस्थिती होती. देशपांडे रुग्णालयातील रक्तविघटन प्रयोगशाळेचे उद्घाटन शुक्रवारी निश्चित करण्यात आले होते.

उद्घाटनाचा कार्यक्रम ठरविताना या प्रयोगशाळेसाठी पाठपुरावा करून निधी मिळविणारे आ. संग्राम जगताप यांच्यासह महापौर सुरेखा कदम यांना प्रशाासनाने विश्वासात घेतले नसल्याची चर्चा होती. त्यामुळे महापौर सुरेखा कदम व आ. संग्राम जगताप यांच्या उपस्थितीकडे लक्ष लागले होते.महापौर कदम, आ. जगताप यांच्यासह उपमहापौर अनिल बोरूडे तसेच सेना व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नगरसेवक गैरहजर राहिले. 


या कार्यक्रमास जिल्हाधिकारी तथा प्रभारी आयुक्त राहुल द्विवेदी, अतिरिक्त आयुक्त विलास वालगुडे, प्रांताधिकारी उज्वला गाडेकर, वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल बोरगे, भाजपचे नगरसेवक सुवेंद्र गांधी, महेश तवले, नगरसेविका उषा नलावडे, माजी नगरसेवक किशोर बोरा, नितीन शेलार, हाजी अन्वर खान, डॉ. दीपक, डॉ. निसार शेख आदी उपस्थित होते. 


आ. संग्राम जगताप यांच्या पाठपुराव्यामुळे रक्तविघटन प्रयोगशाळेतील मशिनरीसाठी सुमारे ९२ लाख रुपयांचा निधी जिल्हा नियोजन मंडळातून मंजूर झाला होता. या प्रयोगशाळेचा उद्घाटन कार्यक्रम पालकमंत्री राम शिंदे यांच्या हस्ते प्रशासनाकडून निश्चित करण्यात आला. 


याबाबत प्रशासनाने मनपाचा कार्यक्रम असतानाही महापौर सुरेखा कदम तसेच आ. संग्राम जगताप यांना विश्वासात घेतले नसल्याचे शिवसेना व राष्ट्रवादीच्या गोटात बोलले जात आहे. त्यामुळे या पदाधिकाऱ्यांनी या कार्यक्रमावर बहिष्कार टाकला.

----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.