मराठा समाजाने पक्ष काढला, तर विरोध,समाज दुभंगण्याची भीती


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- सकल मराठा समाजाने राजकीय पक्ष काढण्याचा निर्णय जाहीर केला आहे. त्याला मराठा महासंघाचे राज्य संपर्क प्रमुख संभाजीराव दहातोंडे यांनी विरोध केला आहे. समाजाने राजकीय पक्ष काढून चूक करू नये, त्यामुळे समाज दुभंग्याची भीती त्यांनी व्यक्त केली आहे.
Loading...

सकल मराठा समाजाने रायरेश्वर मंदिरात राजकीय पक्ष स्थापन करणार असल्याची घोषणा केली; पण हा निर्णय चुकीचा आहे, असे सांगून दहातोंडे म्हणाले, की मराठा क्रांती मोर्चे हे सर्व पक्षांतील नेते व कार्यकर्ते यांच्या सहभागाने निघाले आहेत. सर्व समाज मतभेद, पक्षभेद विसरून सामील झाले; पण आता पक्ष काढला तर समाज वेगळ्या दिशेने जाईल. 

पक्ष, गट, तट यात तो विभागला जाईल. पक्ष काढून प्रश्न सुटणार नाही. उलट गुंते वाढतील. मराठा समाजाचे नेते सर्वंच पक्षांत आहेत. मराठा क्रांती मोर्चात सर्व सहभागी झाले होते. अन्य समाजांनी मोठा भाऊ म्हणून मूकमोर्चांना पाठिंबा दिला. 

मराठा आरक्षणासह अन्य सर्व प्रश्‍न सोडविण्याच्या मागण्यांना सर्वंच पक्षांनी पाठिंबा दिला. प्रश्नांची सोडवणूक करण्याचा प्रयत्न सर्वच पक्षांनी केला. मूकमोर्चांनी एक आदर्श निर्माण केला.

मूकमोर्चांच्या निमित्ताने सर्व एकत्र आले; पण आता मोर्चाला मिळालेल्या यशानंतर काही राजकीय लोक त्यात घुसले. आता त्यांनी राजकारण सुरू केले आहे. आपला स्वार्थ साधण्यासाठी ते पक्ष स्थापन करण्याची भाषा करीत आहेत. हा निर्णय चुकीचा तर आहेच; पण समाजाचे नुकसान करणारा आहे.मराठा समाजाला राजकीय पक्ष काढणे मान्य नाही. 

शेतकरी, कष्टकरी, तरुण, महिला,विद्यार्थी यांच्या प्रश्नांची सोडवणूक केली पाहिजे. त्याकरिता लढा उभारला पाहिजे. आरक्षण मिळवून दिले पाहिजे. समाजाच्या प्रश्नांची सोडवणूक करणे महत्त्वाचे आहे. पक्ष, सत्ता याला महत्त्व नाही. मूळ प्रश्नापासून समाज दूर जाता कामा नये. समाजाला त्यासाठी वेठीस धरू नये. असा प्रयत्न झाला, तर त्यास मराठा महासंघ विरोध करील. त्यासाठी राज्यभर बैठका घेण्यात येतील, असे दहातोंडे यांनी सांगितले.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.