संगमनेरच्या “युटेक’ने थकविले उसाचे पैसे,शेतकऱ्यांचा सामूहिक आत्मदहनाचा इशारा


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- नेवासे तालुक्‍यातील रामडोह येथील शेतकऱ्यांच्या 2017-2018 सालच्या उसाचे पेमेंट संगमनेर तालुक्‍यातील कौठे मलकापूर येथील युटेक शुगर या खासगी कारखान्याने थकवले आहेत. मार्च, एप्रिल महिन्यांत गेलेल्या उसाचा एकही रुपया काही शेतकऱ्यांना न मिळाल्याने मुलांच्या शिक्षणासाठी, लग्नासाठी, पुढील पिकांच्या नियोजनासाठी व्याजाने पैसे घेण्याची वेळ आली आहे. 


Loading...
याबाबत शेतकऱ्यांना कारखाना प्रशासनाकडून उडवाउडवीची उत्तरे मिळत असल्याने शेतकरी मेटाकुटीला आले आहेत. नेवासे तालुक्‍यातील गोदावरीचा नदीकाठचा पट्टा हा उसाचे आगार म्हणून ओळखला जातो. मागील वर्षी पावसाचे प्रमाण जास्त असल्याने उसाचे क्षेत्र वाढले. त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांनी बाहेरील कारखान्यास ऊस दिला. 

संगमनेर तालुक्‍यातील कौठे मलकापूर येथील 'युटेक शुगर' या खासगी साखर कारखान्यास रामडोह येथील शेतकऱ्यांनी आपला ऊस दिला; परंतु एप्रिल महिन्यात गेलेल्या उसाचे पैसे काही शेतकऱ्यांना एफआरपीपेक्षा ही कमी मिळाले, तर काहींना एक रुपया ही मिळाला नाही. 

चालू वर्षी पाऊस कमी झाल्याने दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. या परिस्थितीत पुढील पिके घेण्यासाठी, मुलीच्या लग्नासाठी, मुलांच्या शिक्षणासाठी, दवाखान्यासाठी पैशाची अत्यंत गरज आहे. वर्षभर कष्टाने पिकवलेल्या उसाचे पैसे कारखाना देत नसल्याने शेतकऱ्यांना व्याजाने पैसे घेऊन आपली गरज पूर्ण करावी लागत आहे. 

याबाबत कारखाना प्रशासन, कारखान्याच्या अध्यक्षांशी शेतकऱ्यांनी संपर्क साधला, तर उद्या पेमेंट करतो, परवा करतो म्हणून उडवाउडवीची उत्तरे दिली जात आहेत. त्यामुळे आपण कोणाकडे न्याय मागावा, या चिंतेत शेतकरी पडला आहे. पुढील तीन ते चार दिवसांमध्ये आमचे पैसे मिळाले नाही, तर आम्ही सर्व शेतकरी कारखान्यावर जाऊन सामूहिक आत्महत्या करणार असल्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे. 
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.