सकल मराठा समाज दिवाळीत करणार नव्या पक्षाची स्थापना

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- शैक्षणिक संस्था व शासकीय नोकऱ्यांमध्ये मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मुख्य मागणीसह अन्य विविध मागण्यांसाठी राज्यभर आंदोलनाचे रान पेटवलेला सकल मराठा समाज आता थेट राजकीय आखाड्यात उतरणार आहे. येत्या दिवाळीचा मुहुर्त साधून सकल मराठा समाजाच्या वतीने राजकीय पक्षाची स्थापना केली जाणार आहे. 


मराठा समाजाचा राजकीय पक्ष स्थापनेसंदर्भात कोल्हापुरातील शिवाजी पेठेतील शिवाजी मंदिरात मराठा समाजाचा मेळावा घेण्यात आला. त्यात हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. मराठा समाजाच्या अस्तित्वासाठी राजकीय पक्षाची गरज असल्याचे एकमत झाल्याने आता मराठा समाजाचाही एक राजकीय पक्ष असणार आहे. 

दिवाळीच्या मुहूर्तावर रायरेश्वर मंदिरात या नव्या पक्षाची स्थापना होणार असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली. मराठा समाजाच्या हक्कांसाठी त्यांचा स्वतंत्र पक्ष असावा, या पार्श्वभूमीवर समाजबांधणीसाठी लोकांची मते जाणून घेतली जाणार आहेत. 

त्यासाठी प्रत्येक ठिकाणी दौरे केले जाणार आहेत. त्याची सुरुवात बुधवारी कोल्हापूरमधून झाली. कोल्हापुरात आयोजित करण्यात आलेल्या मेळाव्यात या मुद्द्यावर सगळ्यांचे एकमत झाले आणि त्याची अधिकृत घोषणा करण्यात आली.

Loading...
मराठा समाजाला आरक्षण मिळावे, त्यांच्या सर्व मागण्या मान्य व्हाव्यात यासाठी गेल्या अनेक दिवसांपासून मराठा मोर्चा धुमसत आहे, पण अद्याप यातील कोणतीच मागणी मार्गी लागलेली नाही. सध्याच्या राजकारणात प्रत्येक पक्षात मराठी समाजातील लोक आहेत, पण तरीही मराठा समाजावर अन्याय होत आहे. 

प्रत्येक जण स्वत:च्या समाजाचा फायदा बघत आहेत. त्यामुळे मराठा समाजाला आरक्षण मिळावे, त्यासाठी शिक्षण व्यवस्था सुधारावी, मराठ्यांना नोकरीत आरक्षण मिळावे यासाठी हा नवीन पक्ष स्थापन केला जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

वास्तविक मागील २५ वर्षे विविध मार्गांनी शासनाशी संघर्ष सुरू आहे, परंतु कोणत्याही सरकारने मराठा समाजाची दखल घेतलेली नाही, असे मराठा क्रांती संघटनेचे संस्थापक सुरेश पाटील यांनी दोनच दिवसांपूर्वी घेतलेल्या पत्रकार परिषदेत म्हटले होते. 

दरम्यान, मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मंगळवारी मुंबई उच्च न्यायालयाने एक महत्त्वपूर्ण निर्णय दिला. मराठा आरक्षणासंदर्भात मागास प्रवर्ग आयोगाचा पहिला प्रगती अहवाल यावेळी उच्च न्यायालयात सादर झाला आणि त्यानुसार आता १५ नोव्हेंबरपर्यंत आयोगाला आपला अंतिम प्रगती अहवाल राज्य शासनाला सादर करावा लागणार आहे.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.