पाथर्डी पालिकेच्या विकासाच्या गमजा, दोन वर्षानंतरही शहराच्या प्रकृतीत सुधारणा नाहीच !अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- नोव्हेंबर २०१६ मध्ये नगरपालिकेची निवडणूक झाली. माजी आमदार राजीव राजळे व आमदार मोनिका राजळे यांच्या संयुक्त नेतृत्वावर विश्वास ठेवून शहरवासियांनी भाजपच्या पारड्यात भरघोस मतदानाचे माप टाकताना हाच विचार केला की, आता शहराचा कायापालट होईल. परंतु भाजपची सत्ता येऊन दोन वर्षे होत आली, तरीही शहराच्या प्रकृतीत सुधारणा झाली नाही. 

यावेळी प्रथमच थेट जनतेतून नगराध्यक्षाची निवड झाली. राजीव राजळेंनी त्यासाठी डॉ. मृत्युंजय गर्जे यांची निवड केली. मतदारांची मात्र त्यामुळे प्रतारणा झाली. डॉ. गर्जे यांना शहराच्या स्वास्थ्याचे निदान झाले नसावे, अशी शहराची सध्या अवस्था आहे. पायाभूत सुविधांची पूर्तता बऱ्यापैकी होत आहे, असे वाटत असतानाच स्वच्छता अभियानाची अंमलबजावणी करण्यात डॉक्टर अयशस्वी ठरले. Loading...
त्यांच्या कार्यालयालगतच घाणीचे साम्राज्य आहे. नगरपालिकेची इमारत आणि नव्याने निर्माण होत असलेल्या इमारतीच्या मधोमध हे घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. रस्त्यांची अवस्था तर विचारायलाच नको. पाथर्डी-शेवगाव रस्त्यापासून वामनभाऊ उपनगरातील स्वामी समर्थ मंदिरापर्यंतचा रस्ता आणि नाथनगरचा मुख्य रस्ता वगळता इतर रस्त्यांची अशी अवस्था झाली आहे की, या रस्त्यांची निर्मिती ठेकेदारांच्या उदरनिर्वाहासाठी केली होती की, नागरिकांची यातायात सुसह्य व्हावी म्हणून केली गेली हे कोडे उलगडत नाही. 

ठेकेदार कम नगरसेवक अशा दुहेरी भूमिकेत काहींना स्वारस्य आहे. स्वच्छता अभियानाच्या जाहिराती चितारल्या आहेत, तेथेच स्वच्छतेचा अभाव आहे. सर्वसाधारण सभेत विरोधकांपेक्षा सत्ताधारी नगरसेवकांकडूनच आरोप होतात. दीपाली बंग, संगीता गटाणी या नगरसेविका पदरमोड करुन छोटी-मोठी कामे करत आहेत. प्रसाद आव्हाड, अनिल बोरुडे, दुर्गा भगत, शारदा हंडाळ अशा नव्या दमाचे नगरसेवक प्रभागातील कामांचा अनुशेष भरुन काढण्यासाठी प्रसंगी आंदोलनाची भाषा करत आहेत.


राजीव राजळे यांचे अकाली निधन झाल्याने 'रयतेचा वाली गेला' अशी नागरिकांची झालेली धारणा बदलण्यासाठी आता आमदार मोनिका यांना पालिकेत लक्ष घालून कठोर भूमिका पार पाडावी लागेल. सत्ताधाऱ्यांविषयी जनतेत अविश्वासाची भावना नागरिकांच्या घरांतील तसेच बाजार पेठांतील कचरा वाहून नेणाऱ्या गाड्यांत नियमीतपणा नाही. पिण्याचे पाण्याचा पुरवठा तर सातत्याने अशुद्ध होत आहे. 


त्यामुळे लहान मुलांची पाण्याचा रंग पिवळाच असतो अशी ठाम धारणा झाली आहे. स्वच्छता कर्मचारी कायमच नशेत असल्याने त्यांची अरेरावी खपवून घेण्यापलिकडे पालिकेचे प्रशासकीय अधिकारी काही करू शकत नाहीत. एलईडी दिव्यांवर लाखो रुपये खर्च करुनही दरमहा अर्धेअधिक दिवे बंद पडतातच. 


त्यामुळे संबंधित ठेकेदाराच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होते. स्व. गोपीनाथ मुंडे जॉगिंक पार्क वगळता नव्याने सत्तेत आलेल्या मंडळाकडून नजरेत भरेल असे कोणतेही काम झालेले नाही. त्यामुळे सत्ताधाऱ्यांविषयी जनतेत अविश्वासाची भावना वाढीस लागली आहे.

----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.