बैलाने गिळलेले सोन्याचे गंठण शस्त्रक्रियेद्वारे काढले !


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- बैलपोळा हा बळीराजाचा आनंदाचा सण, प्रत्येक शेतकरी आपल्या बैलाची सजावट करून घरी त्याची मनोभावे पूजा करतात, मात्र पोळ्याच्या दिवशी सोनई जवळचे बेल्हेकरवाडी येथे भाऊसाहेब गणपत शिंदे यांच्या घरी बैलांची पुजा करताना व मलिदा घालताना ताटात बैलाला ओवाळण्यासाठी शिंदे यांच्या पत्नीचे साडेतीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण ठेवण्यात आले होते. बैलपुजा, आरती झाली, त्याच ताटात असलेला पुरणपोळी गुळाचा मलिदा खाता खाता बैलाने ते सोन्याचे गंठणही गिळून घेतले.
Loading...

सर्व पुजा अर्चा झाल्यानंतर शिंदे कुटुंबियांचे ही गोष्ट लक्षात आली, धावपळ, चर्चा झालेनंतर पशुवैद्यकीय अधिकारी डॉ.बी.बी. दरंदले यांना तेथे पाचारण करण्यात आले, त्यांनी सर्व घटना समजावून घेऊन बैलाची पोटाची शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिल्यानुसार शिंदे यांचे बैलाचे पोटाची दीड तासांची यशस्वी शस्त्रक्रिया करून हे सोन्याचे गंठण बाहेर काढण्यात आले. 


बैलाचे पोटावर टाके टाकून औषधोपचार करून ही शस्त्रक्रिया यशस्वी करण्यात आली व शिंदे कुटुंबियांना आपला लाडका बैल सुखरुप दिसला तसेच सोन्याचे गंठणही सरपंच भरत बेल्हेकर यांच्या हस्ते शिंदे यांना देण्यात आले. पशुवैद्यकीय अधिकारी डॉ.बी. बी. दरंदले यांचे परिसरातील ग्रामस्थांनी कौतूक करून आभार मानले. सरपंच बेल्हेकर यांचे हस्ते डॉ.दरंदलेंचा सत्कार करण्यात आला. यावेळी तुकाराम शिंदे, हरिभाऊ पवार, रामभाऊ शिंदे, नाना बाचकर, जनार्दन बेल्हेकर, संकेत शिंदे, माऊली येळवंडे, सचिन शिंदे आदी उपस्थित होते.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.