श्रीगोंदे तालुक्यातील ६४ ग्रामपंचायतीचे १६१ सदस्य अपात्रतेच्या वाटेवर


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- ऑगस्ट २०१५ मध्ये श्रीगोंदे तालुक्यात ६० ग्रामपंचायतीच्या निवडणुका झाल्या होत्या. त्यातील ४६ ग्रामपंचायतीमधील राखीव जागेवर निवडून आलेले ९८ सदस्य आणि डिसेंबर २०१५ ते मे २०१८ या कालावधीत झालेल्या १८ ग्रामपंचायत निवडणुकीत राखीव जागेवर निवडणूक जिंकणारे ६३ सदस्य असे एकूण १६१ ग्रामपंचायत सदस्य अपात्रतेच्या वाटेवर असून, त्यात ११ सरपंच, ६ उपसरपंच १४४ सदस्यांचा समावेश आहे. राज्य निवडणूक आयोगाच्या ७ सप्टेबर २०१८ च्या आदेशाने नगर विकास विभागाच्या सचिवांना आणि सर्व जिल्हाधिका-यांना अपात्रतेच्या कारवाईचे आदेश दिलेले आहेत.
Loading...

मुंबई उच्च न्यायालयात दाखल झालेल्या याचिका क्रमांक १०४७८ / २०१४ मध्ये उच्च न्यायालयाच्या पूर्ण पीठाने दि. ९ डिसेंबर २०१६ रोजी अपात्रतेच्या निर्णय दिला. त्यानुसार स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये मागास्वर्गीयांसाठी आरक्षित असलेल्या जागेवर निवडून आलेल्या सदस्यांनी विहित कालावधीत म्हणजे सहा महिन्याच्या आत वैधता प्रमाणपत्र सादर न केल्यास अशा सदस्यांची निवड भूतलक्षी प्रभावाने रद्द झाली असल्याचे आदेश तत्काळ निर्गमित करावेत असे राज्य निवडणूक आयोगाने १६ डिसेंबर २०१६ च्या पत्रान्वये सर्व जिल्हाधिकाऱ्यांना आणि नगर विकास विभागाच्या सचिवांना दिले होते. तथापि उच्च न्यायालयाच्या उपरोक्त निर्णयाविरुध्द सर्वोच्च न्यायालयात दाखल झालेल्या विविद विशेष अनुमती याचिकांवर दि. २३ फेब्रुवारी २०१७ रोजी सर्वोच्च न्यायालयाने अंतरिम स्थगिती दिली होती. त्यामुळे निवडणूक आयोगाने कारवाई थांबविली होती.

दि. २३ ऑगस्ट २०१८ रोजी सर्वोच्च न्यायालयाने एकत्रित आदेश पारित केले असून, सर्व विशेष अनुमती याचिका फेटाळून मुंबई उच्च न्यायालयाच्या पूर्ण पीठाने ९ डिसेंबर २०१६ रोजी दिलेला आदेश कायम केला आहे.त्यामुळे निवडणूक आयोगाने सर्व जिल्हाधिकाऱ्यांना अपात्रतेच्या कारवाईचे आदेश दिले आहेत. येत्या आठवडाभरात अपात्र सदस्यांना अपात्रतेचे आदेश बजावले जातील आणि त्यांच्या रिक्त होणाऱ्या जागेवर पोटनिवडणूक घेण्याची प्रक्रिया सुरु केली जाईल. विशेष म्हणजे अपात्र ठरलेले उमेदवार पुन्हा निवडणुकीला सामोरे जाऊ शकतात पण त्यांना जात पडताळणीची कायदेशीर पूर्तता करावी लागेल.

श्रीगोंदे तालुक्यातील पिसोरेखंड येथील चार, येळपणे चार, सांगवी दुमाला चार, आनंदवाडी पांच, कोळगाव पांच, निमगाव खलु पांच, वांगदरी सहा, बेलवंडी बुद्रुक आठ , काष्टीचे नऊ ग्रामपंचायत सदस्य अपात्रतेच्या वाटेवर आहेत. या मोठ्या गावांना मोठ्या प्रमाणात पोटनिवडणुकीला सामोरे जावे लागणार असून, पात्र नसणारे उमेदवार निवडणुकीला उभे केल्याची नाचक्की या मोठ्या गांवातील नेत्यांची होणार आहे.

----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.