डॉ. सुजय विखे यांना पुन्हा भाजपची ऑफर.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- आ. शिवाजीराव कर्डिले यांनी पुन्हा राजकीय गुगली टाकत कॉग्रेसचे युवा नेते डॉ. सुजय विखे यांना पुन्हा भाजपची ऑफर दिली आहे. डॉ. विखे भाजपात आले तरच ते खासदार होवू शकतात, असा राजकीय अंदाज त्यांनी पुन्हा एकदा वर्तवला आहे. 

Loading...
सुजय विखे यांनी याबाबत मात्र सावधभूमिका घेत फक्त स्मितहास्य करत अधिक बोलण्यास मोठ्या खुबीने टाळले. कार्यक्रमात नेत्यांनी एकमेकांना राजकीय चिमटे काढल्याने मोठा हास्यकल्लोळ झाला. दरम्यान, आ. कर्डिले व डॉ. विखे यांची अलीकडील काळात चांगलीच राजकीय जवळकीता वाढली आहे. कर्डिले-विखे यांची राजकीय समझोता एक्सप्रेस धावू लागली असल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. 

येथील एका हॉस्पिटलच्या उद्घाटनप्रसंगी आमदार कर्डिले व डॉ.सुजय विखे हे शुक्रवारी एका व्यासपीठावर आले असता. या दोघांमध्ये नेहमीप्रमाणे रंगणारा राजकीय कलगीतुरा येथेही उपस्थितांना अनूभवायला मिळाला. या कार्यक्रमप्रसंगी राष्ट्रीय संत बद्रीनाथ महाराज तनपुरे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून डॉ.सुजय विखे निवडणूक लढवणार असल्याचे निश्चित झालेले आहे. विखे व आमदार कर्डिले यांनी एकत्र लढविलेल्या राहुरी कारखाना व बाजार समित्यांच्या निवडणुकीमुळे आमदार कर्डिले व विखे यांची जवळीक लपून राहिलेली नाही. 

त्यातच भर म्हणून आ.कर्डिले यांनी अनेकवेळा विखेंना भाजपात येण्याची खुली ऑफर दिलेली आहे. त्याचीच पुनरावृत्ती मिरी येथील एका खाजगी कार्यक्रमात पाहावयास मिळाली. डॉ.सुजय विखे हे भाजपकडूनच खासदार होतील असे वक्तव्य करत आमदार कर्डिले यांनी विखेंकडे कटाक्ष टाकताच विखे यांनी देखील स्मितहास्य करत कर्डिलेंच्या बोलण्याला मूक संमती दिली की काय अशी चर्चा देखील उपस्थितांमध्ये रंगली.

यावर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून उपस्थित असलेले डॉ.सुजय विखे बोलतांना म्हणाले, मी वैयक्तिक कोणत्याही पक्षाचा नसून वडील काँग्रेस पक्षाकडून विरोधी पक्षनेते आहेत. तर आई जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा असल्याने मी देखील काँग्रेसचा मानला जात आहे. 

असे म्हणत विखे यांनी खासदारकी कोणत्या पक्षाकडून लढवणार या आ.कर्डिलें यांनी केलेल्या वक्तव्यावर मात्र भाष्य करण्याचे सोयीस्करपणे टाळत. माझे सर्वच राजकीय पक्षातील नेत्यांशी घनिष्ठ संबंध आहेत, परंतु आ.कर्डिलेंची राहुरी कारखाना सुरू करण्यासाठी मला मोठी मदत झाल्याने आपल्याला त्यांच्याबद्दल वेगळा आदर असल्याचे सांगायलाही ते विसरले नाहीत.

त्यामुळे आगामी काळात डॉ.सुजय विखे नेमके कोणत्या पक्षाकडून निवडणूक लढवणार हे मात्र अजूनही गुलदस्त्यातच आहे. परंतु येणाऱ्या विधानसभा व लोकसभा निवडणुकांमध्ये पक्ष बाजूला ठेवून विखे व कर्डिलेंची युती पहायला मिळणार असल्याची चिन्हे सध्या दिसत आहेत.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.