तरूणाचा विहिरीत पडून मृत्यू


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- पोळा सण व रविवार सुटी असल्याने शहरानजीक असलेल्या गोंधवणी गावातील सात ते आठजण तरूण चितळी शिवारात फिरण्यासाठी गेले होते. यावेळी त्यांच्यातील एक तरूण विहिरीत पडला. त्यातच त्याचा मृत्यू झाला. दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास ही घटना घडली. श्रीरामपूर अग्निशमन दलाच्या पथकाच्या अथक प्रयत्नानंतर सुमारे चार तासांनी मृतदेह बाहेर काढण्यात यश आले.

Loading...
 प्रशांत चंद्रभान लबडे (वय ३०, रा. गोंधवणी) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत समजलेली अधिक माहिती अशी की, लबडे याच्यासह सहा ते सात तरूण रविवार व पोळा असल्याने चितळी शिवारातील गट क्र. २२३ मधील अमोल अंकुश कामठे यांच्या क्षेत्रात असलेल्या विहिरीजवळ गेले होते. लबडे हा आंघोळीसाठी विहिरीकडे गेल्याचे समजते. कारण त्याचे कपडे विहिरीच्या जवळ आढळून आले. मात्र, तो विहिरीत पडल्याने सदरची घटनापाहून त्यांच्या समवेत असलेले इतर तरूण पळून गेले. 

एकचजण याठिकाणी उपस्थित असल्याचे मदत कार्यासाठी पोहोचलेल्या अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यानेच प्रशांत विहिरीत बुडाल्याचे घरी व परिसरातील ग्रामस्थांना कळविले. त्यानंतर श्रीरामपूर अग्निशमन दल, पोलीस कर्मचारी, तहसीलदार सुभाष दळवी, चितळीचे तलाठी श्री. कुलकर्णी, निमगावचे तलाठी श्री. चौघुले यांनी घटनास्थळी धाव घेतली. चितळीचे व परिसरातील ग्रामस्थही मोठ्या संख्येने याठिकाणी जमा झाले. विहिरीला मोठ्याप्रमाणात पाणी असल्याने मृतदेह शोधण्यात अडचणी येत होत्या. 

चितळी गावातून जनरेट मागविण्यात येऊन विहिरीतून पाण्याचा उपसा करण्यात आला. दरम्यानच्या काळात श्रीरामपूर अग्निशमन पथकाच्या अथक प्रयत्नानंतर रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास मृतदेह हाती लागला. मृतदेह शवविच्छेदनसाठी पाठविण्यात आला. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते. प्रशांतसह इतर तरूण याठिकाणी नेमके कशासाठी गेले, तो पोहोण्यासाठी गेला की, त्याचा तोल गेला या गोष्टींचा उलगडा होवू शकलेला नाही.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.