श्रीगोंद्यात महिला वाहकाला मारहाण,लज्जास्पद वर्तन केल्याप्रकरणी एका विरोधात गुन्हा दाखल.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- एसटी बसमध्ये स्वत:च्या आजीला बसण्यासाठी जागा करून देताना, इतर प्रवाशांना दमदाटी करणाऱ्या व्यक्तीला मज्जाव करत, बसमधून खाली जा. असे सांगितल्याचा राग मनात धरून. मज्जाव करणाऱ्या बसच्या त्या महिला वाहकाला टाकळीलोणार गावात बसमध्ये चढून मारहाण करत, सदर महिला वाहकासोबत लज्जास्पद वर्तन केल्याची घटना शनिवार दि.८ रोजी, दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास घडली आहे. 

Loading...
या प्रकरणी सदर महिला वाहकाने श्रीगोंदा पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून अनिल रामचंद्र माने रा.टाकळी लोणार,ता श्रीगोंदा याच्याविरोधात सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. शनिवार दि.८ रोजी श्रीगोंदा टाकळी लोणार ही बस टाकळी लोणारला जाण्यासाठी श्रीगोंदा बसस्थानकात उभी होती. यावेळी अनिल रामचंद्र माने हा इसम त्याच्या आजीला घेऊन बसमध्ये चढला. यावेळी आजीला बसमध्ये बसण्यासाठी जागा करून देण्यासाठी तो इतर प्रवाशांना दमदाटी करू लागला.

त्यावेळी त्याठिकाणी ड्युटीवर असणाऱ्या महिला वाहकाने माने यास तुमच्या आजीला मी जागा देते, तुम्ही खाली जा असे समजावून सांगितले. त्याचाच राग आल्यामुळे माने याने त्या महिला वाहकाला तू पुढे ये असे सांगत धमकावले व ही एसटी जेव्हा दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास टाकळीलोणार बसस्थानकावर पोहोचली, तेव्हा माने याने बसमध्ये चढून सदर महिला वाहकाला मारहाण करत शिवीगाळ करून तिच्यासोबत लज्जास्पद वर्तन केले.

सदर घटनेबाबत महिला वाहकाने श्रीगोंदा पोलीस ठाण्यात अनिल रामचंद्र माने याच्याविरोधात दिलेल्या फिर्यादीवरून शासकीय कामात अडथळा, लज्जास्पद वर्तन, दमदाटी, शिवीगाळ केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.