विकासकामांना निधी कमी पडणार नाही : ना. मुंडे

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- स्व. गोपीनाथराव मुंडे यांच्या काळात शेवगाव -पाथर्डी प्रादेशिक नळपाणीपुरवठा योजना झाली होती. ती जुनी झाल्याने आता १८० कोटी रुपयांची खर्चाची नवीन योजना लवकरच केली जाणार आहे, असा दिलासा ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी येथे दिला. शेवगावमध्ये स्व. राजीव राजळे यांच्या आग्रहावरून ना. मुंडे यांनी उपलब्ध केलेल्या सव्वाकोटी रुपये खर्चाच्या महात्मा फुले भाजी मंडईच्या वास्तूचे उदघाटन व नगरसेवक अरुण मुंडे यांच्या प्रयत्नांतून बाजारपेठेतील गणपती मंदिर ते खालची वेस या रस्त्यावरील पेव्हिंग लॉकचे लोकार्पणप्रसंगी ना. बोलत होत्या. 


Loading...
ना. मुंडे म्हणाल्या, शेवगावच्या नगरसेवकांना उशिरा का होईना जाग आली. तीन मुस्लिम बांधवांनी त्यासाठी पुढाकार घेतला. मुस्लिम समाजासाठी भारतीय जनता पक्षाचे काय योगदान आहे, हे त्यांना आता समजेल. शेवगावच्या विकासाची जबाबदारी आपण घेतली आहे. सत्ता नसतानाही स्व. राजीव राजळे यांनी शहरातील भाजी मंडईसाठी निधी मागितला. 

त्या कामाचे आज लोकार्पण होत असताना स्व. राजळे व्यासपीठावर नसल्याची खंत वाटते. राष्ट्रवादीच्या पायाखालची जमीन खचू लागली असून, जाती-पातीला मुठमाती देऊन अशीच एकजूट ठेवा. विरोधक प्रदीर्घ काळ सत्तेत असताना २५ टक्के ग्रामपंचायतींना इमारतीसुध्दा नव्हत्या. आता प्रत्येक ग्रामपंचयतीच्या वास्तूंसाठी थेट निधी उपलब्ध करून इमारती उभारल्या जात आहेत. 


राष्ट्रवादी काँग्रेसच्या व काँग्रेसच्या मंडळीस महात्मा गांधी फक्त नोटावरच दिसतात. पंतप्रधान नरेंद्र मोदींना महात्मा गांधीचा स्वच्छेतेचा संदेश भावला. म्हणूनच अवघ्या चार वर्षाच्या काळात देशात ८० टक्क्यांपेक्षा अधिक शौचालये पूर्ण झाली. ७० वर्षांत विरोधकांनी केवळ खाण्यापलिकडे आणि बगलबच्च्यांची घरे भरण्याचे काम केले,अशी टीका त्यांनी केली. 

----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.