राजाश्रयामुळेच नेवासे तालुक्यातील वाळूतस्करांची मुजोरी : गडाख


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- राजाश्रयामुळेच तालुक्यातील वाळूतस्करांची मुजोरी वाढल्याचा खळबळजनक आरोप माजी आमदार शंकरराव गडाख यांनी बुधवारी केला. वरिष्ठ महसूल अधिकाऱ्यांवर जीवघेणे हल्ले करण्यापर्यंत वाळूतस्करांची मजल गेल्याने तालुक्यातील झपाट्याने ढासळत चाललेल्या कायदा-सुव्यवस्थेबाबत त्यांनी तीव्र चिंता व्यक्त केली. 


Loading...
निंभारी परिसरातील सुरू असलेल्या वाळूतस्करीवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या तहसीलदारांना धक्काबुक्की करून अंगावर जेसीबी घालून जीवे मारण्याचा प्रयत्न झाला. या घटनेने तालुक्यात मोठी खळबळ उडून सामान्य लोकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. 

या पार्श्वभूमीवर माजी आमदार गडाख यांनी निवेदन प्रसिद्ध करून तीव्र चिंता व्यक्त करत महसूल अधिकाऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचा निर्धार व्यक्त केला. गेल्या चार वर्षांत राजकीय आशीर्वादानेच वाळूतस्करी फोफावून गुन्हेगारी प्रचंड वाढल्याने कायदा-सुव्यवस्था चिंताजनक बनल्याकडे गडाख यांनी लक्ष वेधले. 


तालुक्याच्या विविध भागांत राजरोसपणे वाळूचोरी करण्याचे धाडस कोणामुळे, तसेच कशामुळे वाढले याची सखोल चौकशी होण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. देवगडसारख्या पवित्र आणि मोठी कीर्ती असलेल्या देवस्थान परिसरातही राजकीय आश्रयातूनच वाळूतस्करीने घट्ट पाय रोवल्याची खंत व्यक्त करून यासंबंधात कोणी अवाक्षरही काढत नसल्याबद्दल त्यांनी आश्चर्य व्यक्त केले. 


वाळूतस्करीसारख्या बेकायदा व्यवसायामुळे तालुक्यातील विविध भागांतून रक्तरंजित संघर्ष झाल्याची असंख्य उदाहरणे असतानाही केवळ राजकीय दबावामुळेच प्रशासन जुजबी कारवाई पलीकडे ठोस कारवाई करण्यास कचरते. ही प्रवृत्ती ठेचून काढण्याची गरज निर्माण झाल्याकडे गडाख यांनी लक्ष वेधले आहे.

----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.