राजकीय वर्चस्वाच्या वादातून शहर बससेवा बंद पाडली, नवीन करार बेकायदेशीर !


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- शहर बस सेवेबाबत महापालिकेने यशवंत ऑटो प्रा. लि. समवेत केलेला करार न्यायालयाने रद्दबातल ठरविलेला नसून त्याची मुदत १० वर्षांची आहे. म्हणजेच तो करारनामा आजतागायत कायम आहे. अशा परिस्थितीत स्थायी समितीने शहर बससेवेसाठी नवीन संस्थेची नेमणुकीचा केलेला ठराव बेकायदेशीर असून, त्याची अंमलबजावणी करु नये. अशी मागणी यशवंत ऑटोचे संचालक धनंजय गाडे यांनी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्याकडे तक्रार अर्जाद्वारे केली आहे.


Loading...
स्थायी समितीने दि.४ ऑगस्ट रोजी सभेत शहर बससेवेसाठी दीपाली ट्रान्सपोर्ट या संस्थेची निविदा मंजूर करण्याचा ठराव केला. त्यास आक्षेप घेत धनंजय गाडे यांनी ॲड.प्रसन्ना जोशी यांच्यामार्फत जिल्हाधिकाऱ्यांकडे बुधवारी (दि. ८) दुपारी तक्रार दाखल केली आहे..

या तक्रारीत त्यांनी नमूद केले आहे की, मनपाने यशवंत ऑटो या संस्थेशी शहर बस सेवेबाबत १६ ऑगस्ट रोजी १० वर्षांचा करारनामा केलेला आहे. या करारनाम्यात नमुद अटी शर्तींचा भंग महापालिकेनेच केलेला आहे. अभिकर्ता संस्थेला वाहन तळ, वर्कशॉप, ऑफिस, मध्यवर्ती बसस्थानक अशा सुविधा उपलब्ध करुन दिलेल्या नाहीत. तसेच वारंवार मागणी करुनही नुकसान भरपाईची ८० लाखांची थकीत रक्कम अदा केलेली नाही. 


त्यामुळे संस्थेला आर टी ओ टॅक्स, कर्मर्चा­यांचा पगार, डीझेलचे बील, टायर व इतर स्पेअर पार्टचे बील इत्यादी खर्च करता आलेला नाही. केवळ राजकीय वर्चस्वाच्या वादातून अचानकपणे विविध आरोप करुन शहर बससेवा बंद पाडण्यात आलेली आहे. असा आरोपही गाडे यांनी केला आहे.


त्यामुळे जिल्हाधिकारी या नात्याने लवाद कायद्यानुसार मनपा व यशवंत ऑटो यांच्यात उद्भवलेल्या वादात मध्यस्थी करुन तोडगा काढावा तोपर्यंत स्थायी समितीने नवीन संस्था नेमणुकीच्या केलेल्या बेकायदेशीर ठरावाची अंमलबजावणी करु नये, अशी मागणीही धनंजय गाडे यांनी केली आहे.

----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.