कर्ज फेडण्यासाठी अंबानी संपत्ती विकणार !


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :-  मोठा भाऊ मुकेश उद्योगातील प्रतिस्पर्धी कंपन्यांवर मात करण्यासाठी मुक्त हस्ते पैसे खर्च करत असताना धाकटा भाऊ अनिल अंबानी यांच्यावर मात्र कर्जफेडीसाठी संपत्ती विकण्याची पाळी आली आहे.कर्जाच्या ओझ्याखाली दबलेली अनिल अंबानी यांची रिलायन्स कम्युनिकेशन्स ही कंपनी चालू महिनाअखेरपर्यंत २५ हजार कोटी रुपयांची मालमत्ता विकणार आहे. 


Loading...
यातून बहुसंख्य देणी फेडण्यात येणार असून एरिक्सन या कंपनीच्या ५५० कोटी रुपयांचीही परतफेड केली जाणार आहे. अनिल अंबानी यांच्या आरकॉमने सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीदरम्यान ही ग्वाही दिली. एरिक्सन इंडिया प्रा. लि. व अनिल अंबानी यांच्या आरकॉमदरम्यान २०१४ मध्ये सात वर्षांचा करार झाला होता. 

त्यानुसार आरकॉमच्या देशभरातील मोबाईल नेटवर्कच्या व्यवस्थापनाची जबाबदारी एरिक्सनला देण्यात आली होती. मात्र, या सेवेपोटी देय असलेले पंधराशे कोटी रुपयांचे देयक आरकॉमने बुडवल्याचा आरोप एरिक्सनने केला होता. 


अनिल अंबानी यांनी दाद न दिल्याने एरिक्सनने राष्ट्रीय कंपनी कायदा लवादाकडे धाव घेतली होती. लवादाने एरिक्सनच्या बाजूने निकाल दिल्यानंतर हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात पोहोचले.या कालावधीत उभय कंपन्यांमध्ये ५५० कोटी रुपयांवर तडजोड झाल्याने सर्वोच्च न्यायालयानेही यास मंजुरी दिली. 


तीन ऑगस्टला झालेल्या या सुनावणीत न्यायालयाने आरकॉमला स्पेक्ट्रम, फायबर, टेलीकॉम टॉवर आदींची विक्री करून २५ हजार कोटी रुपयांची रक्कम जमा करण्याची परवानगी दिली. तसेच, तडजोडीपोटीची ५५० कोटी रुपयांची रक्कम एरिक्सनला सप्टेंबरअखेरपर्यंत द्यावी, असा आदेशही दिला. त्यानुसार अनिल अंबानी आरकॉमची सुमारे २५ हजार कोटींच्या संपत्तीची विक्री करणार आहेत.

----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.