शांततेच्या मार्गाने आंदोलन करण्याचे मराठा समाजाला प्रशासनाचे आवाहन.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- सकल मराठा मोर्चा समितीने दिनांक 9 ऑगस्ट रोजी पुकारलेल्या रास्ता रोको आणि ठिय्या आंदोलन शांततामय मार्गाने करण्याचे आवाहन जिल्हा प्रशासन आणि जिल्हा पोलिस प्रशासनाने केले आहे. कोणत्याही परिस्थितीत जिल्ह्यातील शांततामय वातावरण बिघडणार नाही, याची काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी आणि जिल्हा पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांनी म्हटले आहे.

यासंदर्भात आज येथील जिल्हाधिकारी कार्यालय सभागृहात जिल्हाधिकारी श्री. द्विवेदी आणि जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. शर्मा यांनी सकल मराठा मोर्चा समितीच्या सदस्यांची चर्चा केली. त्यांनी आंदोलनासंदर्भात सकल मोर्चा सकल मराठा मोर्चा समितीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे म्हणणे ऐकून घेतले. 


Loading...
तसेच राज्य शासनाची आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भूमिका त्यांना समजावून सांगितली. यावेळी सकल मराठा मोर्चा समितीचे सदस्य संभाजी दहातोंडे, गोरख दळवी, बाळासाहेब पवार, शिवाजीराव कराळे, अनुराधा येवले यांच्यासह इतर सदस्य उपस्थित होते. तसेच प्रशासनाच्या वतीने अधिसंख्य सहायक जिल्हाधिकारी प्राजित नायर, निवासी उपजिल्हाधिकारी प्रशांत पाटील, उपजिल्हाधिकारी प्रियांका आंबेकर, तहसीलदार श्री. शेख आदींची उपस्थिती होती.

यावेळी प्रशासनाच्या वतीने, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिनांक 5 ऑगस्ट रोजी रोजी सर्व जनतेला उद्देशून केलेले आवाहनही पुन्हा ऐकवण्यात आले. त्यानंतर जिल्हाधिकारी श्री. द्विवेदी आणि श्री. शर्मा यांनी उपस्थितांशी संवाद साधला.

यावेळी श्री. द्विवेदी म्हणाले की, हे आंदोलन शांततेच्या मार्गाने होईल यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे. त्यासाठी आपली सर्वांची भूमिका महत्वाची आहे. प्रशासनाला सहकार्य करणे आणि जिल्ह्यातील शांततामय वातावरण बिघडणार नाही, याची काळजी सर्वांनी घ्यावी. या आंदोलनात बाह्य शक्ती घुसणार नाहीत, याची दक्षताही आंदोलकांनी घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले. प्रशासन तुमची भूमिका निश्चितपणे राज्य शासनापर्यंत पोहोचवेल. त्यामुळे कोणाला त्रास होणार नाही अशा पद्धतीने हे आंदोलन व्हावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

यापूर्वी झालेले मराठा क्रांती मोर्चा व इतर आंदोलने शांततामय मार्गाने झाले आहेत त्यामुळे दिनांक 9 ऑगस्टचे आंदोलनही शांततामय पद्धतीने होईल यासाठी सकल मराठा मोर्चा समितीने सर्वांना आवाहन करावे. आपला जिल्हा शांततामय जिल्हा आहे. त्यामुळे आंदोलन आंदोलनाला गालबोट लागणार नाही याची दक्षता आपण सर्वांनी घेतली पाहिजे, असेही जिल्हाधिकारी श्री. द्विवेदी यांनी उपस्थितांना आवाहन केले.

यानंतर जिल्हा पोलीस अधीक्षक श्री शर्मा यांनीही आंदोलनासंदर्भात सकल मराठा मोर्चा समितीच्या कार्यकर्त्यांना आवाहन केले. कृपया आंदोलना संदर्भातील माहिती पोलिस प्रशासनाला अगोदर द्यावी. कोणत्याही बाह्य शक्ती आंदोलनात येणार नाहीत याची काळजीही समितीने घ्यावी तसेच समितीने स्वयंप्रेरणेने आंदोलनाच्या ठिकाणी चित्रीकरण करावे जेणेकरून अशा बाह्य शक्ती या आंदोलनात गैरफायदा घेणार नाहीत. 

आंदोलनाच्या दरम्यान पोलिस प्रशासनाला कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने सर्व ते सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले. मागील आंदोलनाच्या वेळी काही ठिकाणी घडलेल्या घटनांच्या संदर्भात दाखल जुन्या गुन्ह्यांची खातरजमा करून ज्यांचा सहभाग नाही त्यांची नावे शासनाच्या निर्देशानंतर वगळण्यात येतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.

कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने जिल्ह्यात 150 अधिकारी, दोन हजार पोलीस कर्मचारी, 800 होमगार्डस आणि राज्य राखीव पोलीस दलाच्या दोन तुकड्या असा बंदोबस्त असणार आहे. यावेळी समितीच्या वतीने श्री संभाजी दहातोंडे, गोरख दळवी , बाळासाहेब पवार, अनुराधा येवले यांच्यासह इतर कार्यकर्त्यांनी दिनांक 9 ऑगस्टच्या आंदोलना संदर्भातील त्यांची भूमिका मांडली. हे आंदोलन शांततामय आणि संयमी पद्धतीने होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.