विखे पाटील लवकरच भाजपमध्ये, चिरंजीवांना खासदारकीचे तिकीट मिळणारच!


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- राज्याचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे हे विखे राहिले नसून ते 'बिके' झालेले आहेत, असा घणाघाती आरोप करत राज्याचे सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि विखे पाटील या दोघांमध्ये पॉलिटिकल अफेअर असून मुख्यमंत्र्यांनी डोळा मारला की खाली बसायचे, आणि मनातल्या मनात 'आय लव्ह यू' म्हणायचे अशी खिल्लीही त्यांनी उडवली. 

विखे पाटील लवकरच भाजपमध्ये जाणार असून त्यांच्या चिरंजीवांना भाजपकडून खासदारकीचे तिकीट मिळणारच हे मी 'स्टॅम्प'वर लिहून देतो, अशी हमी त्यांनी भरली. मंत्री पाटील सोमवारी नगर दौऱ्यावर आले होते, याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी शिवसेनेचे उपनेते अनिल राठोड, महापौर सुरेखा कदम, उपमहापौर अनिल बोरुडे, जिल्हा प्रमुख प्रा. शशिकांत गाडे, शहर प्रमुख दिलीप सातपुते, सभागृह नेते गणेश कवडे आदी उपस्थित होते. 

पाटील म्हणाले, टोपली विणणारा आमदार झाला, कोणी गाडी ढकलणारा आमदार झाला, टपरीवाला आमदार झाला, कारण शिवसेना हे रसायनच असे आहे. सर्वांनी शपथ घ्यायची एकानेही पैसा वाटायचा नाही, मग निवडणूक लढवून दाखवा. शिवसेनेला संपवण्याचे चौफेर प्रयत्न सुरू आहेत. 


Loading...
राष्ट्रवादी तर आता संपल्यात जमा आहे, फक्त तुमच्या नगरमध्येच राष्ट्रवादी थोडीफार शिल्लक आहे. आमच्याकडे तर त्यांनी खातेही उघडले नाही, असे म्हणत त्यांनी राष्ट्रवादीवरही जोरदार हल्ला चढवला. काँग्रेस आता संपली असून विरोधीपक्षनेते राधाकृष्ण विखे यांनी स्वत:ला गहाण ठेवले आहे. विखे नगरचे भाग्यविधाते असतील, पण ते अर्धे भाजपचे आहेत, अशीही टीका त्यांनी केली.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.