पन्नासवर्षीय प्रियकराने प्रेयसी, तिच्या मुलीसह नातीला पेटवले, नऊ महिन्यांच्या चिमुकलीचा मृत्यू


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- सारे जग मैत्री दिवस साजरा करून झोपी गेलेले असताना नाशिक शहरात मन सुन्न करणारी घटना घडली. प्रियकराने प्रेयसीसह तिच्या मुलीच्या व नातीच्या अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकून त्यांना पेटवून दिल्याची घटना सोमवारी (दि. ६) पहाटेच्या सुमारास घडली. 

या घटनेत नऊ महिन्यांच्या चिमुकलीचा मृत्यू झाला असून, प्रेयसी व तिची मुलगी गंभीररीत्या भाजल्याने त्यांच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. संशयित प्रियकर फरार असून, त्याच्या शोधार्थ पंचवटी पोलिसांनी दोन पथके रवाना केली आहेत.

Loading...
दिंडोरी रोडवरील मनपाच्या मायको दवाखाना परिसरातील कालिकानगरमधील अंगणवाडीजवळ दोन-तीन दिवसांपूर्वी राहण्यास आलेली संगीता सुरेश देवरे (वय ३८) या महिलेचे उत्तर प्रदेशातील मथुरा येथील प्रियकर जलालुद्दीन खान (५५) याच्यासोबत प्रेमसंबंध होते. 

जलालुद्दीन संगीताच्या घरी राहत असल्याने, संगीता त्यास विरोध करीत असे. तू कायम माझ्या घरी राहू नकोस, असे ती त्याला सांगत होती. यावरून त्यांच्यात नेहमी वाद होत होते. काही दिवसांपासून संगीताची तब्येत बरी नसल्याने रविवारी (दि. ५) तिची मुलगी प्रीती रामेश्वर शेंडगे (२०, रा. कोणार्कनगर, आडगाव) आपल्या नऊ महिन्यांच्या सिद्धीला घेऊन आईची काळजी घेण्यासाठी मुक्कामी आली होती. 

मनात काहीतरी राग असलेल्या जलालुद्दीनने सोमवारी (दि. ६) पहाटे ४.३० वाजेच्या सुमारास गाढ झोपी गेलेल्या संगीतासह तिच्या मुलीच्या अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकून पेटवून दिले. अचानक मोठ्याने किंचाळण्याचा आवाज ऐकू आल्याने शेजारी राहणारे नागरिक जागे झाले. 

यातील काहींनी पेटलेल्या अवस्थेत असलेल्या महिलांच्या व चिमुरडीच्या अंगावर ब्लँकेट व बारदान टाकून आग विझविली. भाजलेल्या तिघींना जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले असता, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी चिमुकल्या सिद्धीला मृत घोषित केले, तर गंभीररीत्या भाजलेल्या संगीता व प्रीती या दोघींवर जळीत कक्षात उपचार सुरू आहेत. संशयित जलालुद्दीन खान फरार असून, पंचवटी पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.