आरक्षणासाठी आमदार,खासदार आणि मंत्र्यांच्या गाड्या फोडाव्या लागतील


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- भाजप सरकारने धनगर समाजास आरक्षणासाठी रस्त्यावर उतरण्याची वेळ आणली असून यापुढे उग्र स्वरुपाचे आंदोलन करावे लागणार आहे. आमदार, खासदार व मंत्र्यांच्या गाड्या फोडाव्या लागतील. पहिल्या गाड्या धनगर समाजाचे मंत्री महादेव जानकर, राम शिंदे, व खासदार डॉ.विकास महात्मे यांच्या फोडाव्या लागणार आहेत तरच घटनेने दिलेले न्याय हक्काचे आरक्षण मिळेल, असे प्रतिपादन दत्तात्रय खेमनर यांनी केले. 

Loading...
धनगर समाजाच्यावतीने येथील ग्रामदैवत वीरभद्र देवस्थान येथून तहसील कार्यालयावर पारंपारीक डफांच्या निनादात मोर्चा नेवून शासनाच्या निषेधाच्या घोषणा देत रोष व्यक्‍त करण्यात आला. मोर्चाचे रुपांतर सभेत झाले त्यावेळी खेमनर बोलत होते. ना. महादेव जानकर, ना. राम शिंदे व डॉ.विकास,महात्मे हे राज्य सरकारचे हस्तक आहेत. हे जोपर्यंत सरकारमध्ये आहेत, तोपर्यंत धनगर समाजास आरक्षण मिळणार नाही. 

मराठा समाजाच्या आमदार, खासदारांचा आदर्श घेवून जाणकर, शिंदे व महात्मे यांनी समाजाच्या प्रश्‍नावर राजीनामा द्यायला हवा. भाजप सरकार कॉंग्रेस राष्ट्रवादी सरकारपेक्षा निर्लज्य निघाले. यांना त्यांची जागा दाखवून द्यावी लागेल. न्याय हक्कासाठी लढा अधिक तीव्र स्वरुपाचा करावा लागेल असे खेमनर म्हणाले. 

घटनेने दिलेल्या न्याय हक्काची अंमबजावणी राज्य व केंद्र सरकारने पार पाडण्याची गरज असतांना सरकारने धनगर समाजाची घोर फसवणूक केली आहे. भाजप सत्तेवर आल्यानंतर पंधरा दिवसात आरक्षण देण्याची घोषणा मुख्यमंत्री फडणवीस यांनी केली होती. खोट्या घोषणा करुन त्यांनी धनगर समाजाची फसवणूक केल्याचे दिलीपराजे सातव म्हणाले.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.