शिर्डी भक्तनिवासातून १५ लाखांच्या सोन्याच्या दागिन्यांची चोरी


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- साईबाबा संस्थानच्या द्वारावती भक्तनिवासमधून ठाणे येथील साईभक्ताची पॅन्ट अज्ञात चोरट्याने लंपास केल्याने त्यातील सुमारे १५ लाखांचा ऐवज चोरीला गेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सदर प्रकार सोमवार दि. ५ रोजी सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास घडला. 

दरम्यान याबाबत शिर्डी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल नसल्याचे समजले. ठाणे येथील साईभक्त हेमंत पाटील हे साईदर्शनासाठी शिर्डीत आले होते. त्यांच्या सोबत त्यांचे आणखी एक नातेवाईक होते. त्यांनी नेहमीप्रमाणे द्वारावती भक्तनिवासमध्ये १४३ नंबरची रुम भाड्याने घेतली होती. 
Loading...

सोमवारी सकाळी ८.३० वाजेच्या सुमारास सदर भक्ताने आंघोळ केली. भांग पाडण्यासाठी कंगवा नसल्याने त्यांनी पॅन्टच्या खिशातून पैसे काढून या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या एकास कंगवा आणण्यासाठी पैसे दिले. त्याने कंगवा आणून दिला. यावेळी हेमंत पाटील यांना फोन आल्याने ते फोनवर बोलत असताना दरवाजा उघडा असल्याचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने त्यांची पॅन्ट लंपास केली. 

काही वेळानंतर पॅन्ट गायब झाल्याचे लक्षात आहे. शोधाशोध केली; मात्र पॅन्ट मिळून आली नाही. त्यांनी भक्तनिवासच्या काउंटरवर याबाबत माहिती दिली. त्यानंतर साईबाबा संस्थान सुरक्षा विभागाचे पोलीस उपअधीक्षक आनंद भोईटे, शिर्डी पोलीस स्टेशनचे स.पो.नि. प्रविण पाटील, उपनिरीक्षक संदीप कहाळे यांनी भेट देऊन घटनास्थळाची पाहाणी केली. 

चोरी गेलेल्या पॅँटमध्ये या भक्ताच्या गळयातील सोन्याचा गोफ, अंगठी असे ५२ तोळ्याचे सोन्याचे दागिने व ४० हजारांची रोकडचा समावेश आहे. या ठिकाणी सी.सी.टी.व्ही. नसल्याने या भक्ताने तीव्र नाराजी व्यक्त केली. साईबाबा संस्थानने या ठिकाणी तातडीने सी.सी.टी.व्ही. बसवावे, अशी मागणी केली. कॅमेरे असते तर सदर चोरीची घटना घडली नसती, असे यावेळी भक्त वर्गातून बोलले जात आहे. 
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.