मराठा आरक्षणासाठी आणखी पाच युवकांच्या आत्महत्या


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- मराठा आरक्षणासाठी आक्रमक झालेल्या मराठा समाजातील युवकांच्या आत्महत्येच्या दुर्दैवी घटना रोजच घडू लागल्या आहेत. रविवारी राज्यातील विविध भागांत आणखी पाच जणांनी आत्महत्या केली. परभणी जिल्ह्यात डिग्रसवाडी (ता. सेलू) येथे मराठा समाजास आरक्षण मिळावे यासाठी अभियंता असलेल्या तरुणाने स्वत: पेटवून घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. 

नांदेडच्या अर्धापूर तालुक्यात घराच्या छतावरून उडी मारून एका युवकाने आत्महत्या केली. बीड येथे २२ वर्षीय मराठा तरुणाने राहत्या घरात दोरीने गळफास घेऊन जीवनयात्रा संपविली.जालना जिल्ह्यातील हिसोडा (ता. भोकरदन) येथील विद्याथ्र्याने आरक्षणाअभावी आयटीआयला नंबर न लागल्याच्या नैराश्यातून गळफास घेतला. त्याला दहावीत ६६.६० टक्के गुण होते.तर, कोल्हापूरमध्ये मराठा आंदोलनात भाग घेतल्यानंतर एका युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केली. 
Loading...

परभणी जिल्ह्यातील सेलू तालुक्यातील डिग्रसवाडी येथील तरुण अभियंता अनंत सुंदरराव लेवडे (२४) यांनी मराठा समाजास आरक्षण मिळत नसल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना स्वत:च्या फेसबुक खात्यावरून पोस्ट करून समाजास आरक्षण मिळत नसल्याची खंत व्यक्त केली होती. तसेच स्वत: समाजासाठी बलिदान देत आहे, अशी पोस्ट फेसबुकवर टाकली. परंतु, त्याची दखल घेण्यात आली नाही. 

रविवारी (दि.५) गावाजवळील उजव्या कालव्याच्या बाजूच्या शेतात अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेत आत्महत्या केली. मयत अनंत लेवडे यांनी इंजिनीअरिंगमध्ये पदविका घेतली होती. त्याने खाजगी कंपनीमध्ये देखील नोकरी केली होती, परंतु चार वर्षे कंपनीत काम केल्यानंतरही कायम करण्यात आले नाही व कामावरून कमी करण्यात आले. मराठा समाजाला आरक्षण नसल्याने नोकरी मिळत नाही, यांची खंत त्याच्या मनात सलत होती. 

मराठा आरक्षणासाठी करण्यात येत असलेल्या आंदोलनात सक्रिय सहभाग नोंदवत मयत अनंत लेवडे यांनी मुख्यमंत्र्यांना फेसबुक खात्यावर मराठा समाजास आरक्षण मिळावे, अशी पोस्ट केली असल्याची माहिती कुटुंबातील सदस्यांनी दिली. या पोस्टमध्ये म्हटले आहे की, देशासाठी काही करता आले नाही; परंतु समाजासाठी बलिदान देत आहे. अशी पोस्ट टाकून त्यांनी आपली जीवनयात्रा संपवली.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.