महागाई भत्त्यासह सातव्या वेतन आयोगाचा वेतनलाभ जानेवारी पासून - मुख्यमंत्री फडणवीस.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- राज्य शासनाचे अधिकारी आणि कर्मचारी यांना २०१७ मधील थकित महागाई भत्त्यासह सातव्या वेतन आयोगाचा वेतनलाभ जानेवारी २०१९ पासून देण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत शनिवारी 'वर्षा' निवासस्थानी विविध अधिकारी-कर्मचारी संघटनांसमवेत झालेल्या बैठकीत घेण्यात आला. 

राज्यातील दीड लाख राजपत्रित अधिकारी सरकारच्या वेळकाढूपणाच्या धोरणाच्या निषेधार्थ ७ ते ९ ऑगस्ट अशा तीन दिवसांच्या संपावर जाणार असल्याची घोषणा महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाने केली होती, त्या पार्श्वभूमीवर झालेल्या बैठकीत हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. 
Loading...

मुख्यमंत्री फडणवीस या वेळी म्हणाले की, राज्य शासकीय अधिकारी आणि कर्मचारी यांना निर्धारित जानेवारी २०१६ या महिन्यापासूनच सातवा वेतन आयोग लागू केला जाईल. यासाठी शासनाने के. पी. बक्षी यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली आहे. पण सहाव्या वेतन आयोगात अनेक अधिकारी आणि कर्मचारी यांच्या वेतनात त्रुटी राहिल्या. त्या त्रुटींसंदर्भात सुनावण्या घेण्याचे काम सध्या बक्षी समितीला करावे लागत आहे. 

हे काम अंतिम टप्प्यात असून लवकरच अहवाल शासनास सादर करू, असे के.पी. बक्षी यांनी आपणास कळवले आहे. त्यानंतर कर्मचाऱ्यांना चांगली वेतनवाढ देणारा सातवा वेतन आयोग निर्धारित तारखेपासून लागू करण्यास शासन कटिबद्ध आहे. पण या सर्व प्रक्रियेस काही कालावधी लागणार असल्याने कर्मचाऱ्यांसाठी वेतनलाभ लागू करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती, असे त्यांनी सांगितले. 

त्यानुसार केंद्र शासनाच्या वेतन निश्चितीच्या सूत्रानुसार, जानेवारी २०१९ पासून वेतन लाभ देण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच महागाई भत्त्याची १४ महिन्यांची थकबाकी देण्याबाबतही निर्णय घेण्यात आला. या सर्व बाबींसाठी अंदाजे ४ हजार ८०० कोटी रुपयांची तरतूद शासन उपलब्ध करून देणार आहे.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.