विद्यार्थिनीसह बेपत्ता प्राचार्य महिनाभराने सापडला.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- श्रीरामपूर तालुक्यातील एका अभियांत्रिकी महाविद्यालयातील प्राचार्य विद्यार्थिनीसह पसार झाला होता. त्या दोघांना महिनाभरानंतर वारूंजी (ता. कराड) या गावातून पोलिसांनी ताब्यात घेतले. दोघांना श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात हजर करण्यात आल्यानंतर दोघांच्या कुटुंबाचे जबाब घेतल्याची माहिती पोलीस निरीक्षक संपत शिंदे यांनी दिली.

Loading...
याबाबत पोलिसांकडून समजलेली अधिक माहिती अशी : तालुक्यातील एका अभियांत्रिकी महाविद्यालयातील तरूणी बेपत्ता असल्याची तक्रार शहर पोलिसांत महिनाभरापूर्वी दाखल करण्यात आली होती. मात्र, ही तरूणी एकटी नसून तिच्यासोबत प्राचार्य असल्याचे पोलीस चौकशीत निष्पन्न झाले. तेव्हापासून पोलिसांनी नगर, औरंगाबाद, पुणे, नाशिक, सोलापूर या ठिकाणी या दोघांचाही शोध घेतला. 

मात्र, ते मिळाले नाहीत. पोलिसांनी राज्यभर याबाबत सर्व पोलीस ठाण्यास माहिती दिली होती. त्यानंतर प्राचार्याच्या मोबाइलवरून एका पाण्याच्या जारसाठी झालेला कॉल पोलिसांना त्याच्यापर्यंत जाण्यासाठी महत्त्वाचा दुवा ठरला. त्यानंतर शहर पोलीस ठाण्यातील हवालदार रामेश्वर ढोकणे व पोपट खराडे यांना कराडला रवाना केले.

त्यानंतर त्यांना मोबाइल टावरच्या लोकेशनवरून सदर तरूणी व प्राचार्य रहात असलेल्या भागाचा उलगडा झाला. कराड शहर पोलिसांनी वारूंजी गावचे पोलीस पाटील दिलीप चव्हाण यांची मदत घेत जार देणाऱ्या कर्मचाऱ्यासह पोलीस प्राचार्याच्या घरी पोहोचले. त्यांनी तात्काळ प्राचार्यासह बेपत्ता तरुणीस ताब्यात घेत आज सकाळी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात दाखल झाले. 

दरम्यान, याबाबतची माहिती तरुणी व प्राचार्याच्या घरच्यांना कळाल्यानंतर पोलीस ठाण्यात मोठी गर्दी जमा झाली होती. तरूणीचे पोलिसांनी जबाब घेण्यात आले. त्यानंतर तिची महिला सुधारगृहात रवानगी करण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक संपत शिंदे यांनी पत्रकारांना दिली.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.