राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर घुले यांच्या राजीनाम्याची मागणी


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- शेवगाव नगरपरिषदेच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीत राष्ट्रवादी काँग्रेसला मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले. त्याची नैतिक जबाबदारी स्वीकारून राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष व माजी आमदार चंद्रशेखर घुले यांनी आपल्या पदाचा तत्काळ राजीनामा द्यावा, अशी मागणी पंचायत समितीचे माजी सभापती अविनाश मगरे यांनी केली.

नगरपरिषदेच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसकडे पुरेसे संख्याबळ असतानाही सत्ता स्थापन करण्यात अपयश आले. होम ग्राउंडवरच चंद्रशेखर घुले यांना जबरदस्त धक्का भाजपने दिला. त्याची नैतिक जबाबदारी घुले यांच्यावरच आहे. शेवगाव व पाथर्डी मतदारसंघांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची मोठी पिछेहाट झाली आहे. 
Loading...

शेवगाव बाजार समिती सोडली, तर घुले बंधूंच्या हातात काहीच उरलेले नाही. घराणेशाही व त्याच-त्याच प्रमुख कार्यकर्त्यांना सतत बसवणे, त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शेवगाव तालुक्यात अस्तित्वहीन झाली आहे, असा आरोप मगरे यांनी पत्रकात केला आहे. पंचायत समितीचे सभापतिपदही घुले बंधू यांनी स्वतःच्या घरात घेतले आहे. जिल्हा परिषदेचे उपाध्यक्षपदही घरातच दिले. 

पंचायत समितीचे सभापती ही जागा ओबीसीकरिता राखीव असतानाही क्षितीज घुले यांना त्यांनी तेथे बसवले. त्यामुळे साखरसम्राट व प्रस्थापितांच्या विरोधात मोठा असंतोष शेवगाव व पाथर्डी मतदारसंघांत निर्माण झाला आहे. तो विधानसभेच्या आगामी निवडणुकीतही दिसून येईल, असे मगरे यांनी शुक्रवारी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.