आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी संबंधित पोलिसांवर गुन्हे नोंदवा


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- पोलिसांसमोर विष प्राशन केलेल्या गोरख मुंडलिक या सराफाची प्रकृती चिंताजनक असून त्याला कामगार रूग्णालयातून अहमदनगर येथील मॅक्स केअर रूग्णालयात हलविण्यात आले आहे. दररम्यान, मुंडलिक यांच्या पत्नीने पोलिसांनी आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. 

Loading...
बुधवारी (दि. १) गोरख दिगंबर मुंडलिक (वय ४७, रा. श्रीरामपूर) या सराफाच्या दुकानात संगमनेर येथील पोलीस पथक एका इराणी आरोपीस तपासासाठी शहर पोलीस ठाण्यात घेऊन आले.त्यांनी पोलीस ठाण्यात नोंदही केली. स्थानिक पोलीस घेऊन आरोपीने दाखविलेल्या दुकानात हे पथक गेले.मुंडलिक यांच्याकडे चोरीचे सोने घेतल्याबाबत पोलिसांनी विचारणा केली. 

मुंडलिक यांनी मात्र त्याचा इन्कार केला. यावरून मुंडलिक व पोलीस यांच्यात बाचाबाची झाली. संतापलेल्या मुंडलिक यांनी विषाची बाटली तोंडाला लावली. त्यांना तात्काळ येथील कामगार रूग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले. 

मात्र, रात्री उशिरा प्रकृती खालावल्याने त्यांना अहमदनगरला हलविण्यात आले. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू असून प्रकृती चिंताजनक आहे.दरम्यान, या घटनेचा सर्व सराफ व्यावसायिकांकडून पोलिसांचा निषेध करण्यात आला. शिवाय मुंडलिक यांच्या समर्थनार्थ बंदही पाळण्यात आला. 

गोरख मुंडलिक यांच्या पत्नी सुरेखा यांनी शहर पोलीस ठाण्यात याबाबत निवेदन दिले असून पोलिसांनी विनाकारण दिलेल्या जाचास कंटाळूनच माझ्या पतीने आत्महत्येचा प्रयत्न केला असल्याचे म्हटले आहे. संबंधित पोलिसांवर मुंडलिक यांना विष घेण्यास प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

या घटनेच्या विरोधात बुधवारी (दि.१) राहुरी, संगमनेर, लोणी, कोल्हार, बाभळेश्वर, तर काल (दि. २) श्रीरामपूर व बेलापूर येथील सराफ व्यावसायिकांनी आपले व्यवहार बंद ठेवून या घटनेचा निषेध नोंदविला.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.