जनसंघर्ष यात्रेच्या माध्यमातून काँग्रेसचा पुन्हा सरकार विरोधात ‘एल्गार’!


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- काँग्रेस पक्षाच्या राज्यव्यापी जनसंघर्ष यात्रेचा शुक्रवारी कोल्हापुरातून प्रारंभ होत असून यात्रेसाठी रवाना होण्यापूर्वी विरोधी पक्षनेते ना.राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज श्री क्षेत्र निझर्णेश्वर येथे महाअभिषेक करून दर्शन घेतले.

Loading...
केंद्र आणि राज्य सरकारच्या लोकविरोधी, भ्रष्ट कारभाराच्या विरोधात हा जनसंघर्ष सुरू होणार असून अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे महासचिव आणि राज्याचे प्रभारी मल्लिकार्जून खर्गे यांच्यासह राज्यातील काँग्रेस पक्षाचे सर्व प्रमुख नेते यामध्ये सहभागी होणार असल्याचे ना.विखे पाटील यांनी यासंदर्भात माहिती देताना सांगितले. 

आगामी लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व लोकसभा मतदारसंघात ही जनसंघर्ष यात्रा जाणार आहे.जनसंघर्ष यात्रेचा पहिला टप्पा ३१ ऑगस्ट रोजी कोल्हापुरातून सुरू होणार असून पश्चिम महाराष्ट्रातील पाचही जिल्ह्यांमध्ये मार्गक्रमण करून ८ सप्टेंबर रोजी पुण्यात यात्रेचा समारोप केला जाईल. मागील चार वर्षात केंद्र आणि राज्य सरकारने लोकविरोधी निर्णय घेतल्याने सर्वसामान्य जनतेला मोठा फटका बसला आहे. 

देशाची अर्थव्यवस्था प्रभावित करणारी नोटाबंदी, दरवर्षी २ कोटी युवकांना नोकरी देण्याची फसवी घोषणा, राफेल विमान घोटाळा आदी प्रमुख मुद्द्यांबरोबरच शेतक‍ऱ्यांचे प्रश्न, फसवी शेतकरी कर्जमाफी, कट्टरवादी संघटनांना मिळणारा राजाश्रय, मराठा, मुस्लीम, धनगर समाजांच्या आरक्षणाबाबत केला जाणारा वेळकाढूपणा, अल्पसंख्यांक समाजात निर्माण झालेले असुरक्षित वातावरण, कामगार, आदिवासी भागातील कुपोषणाची समस्या सोडविण्यात सरकारला आलेले अपयश, महिला, युवक, विद्यार्थी, सरकारी कर्मचारी, व्यापारी, कामगार अशा अनेक घटकांमध्ये असलेला असंतोष आदी विषयांवर जनसंघर्ष यात्रेच्या माध्यमातून काँग्रेस पक्ष सरकारचा पदार्फाश करणार असल्याचे ना.विखे पाटील यांनी यावेळी सांगितले.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.