आरक्षणविरोधात आंदोलन करणार असल्याच्या बातम्या खोटया - अण्णा हजारे.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :आरक्षणाविरोधात आपण आंदोलन करणार असल्याच्या सोशल मीडियावर येत असलेल्या बातम्या खोटया असल्याचे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे. 


Loading...
या पत्रात हजारे यांनी म्हटले आहे की, गेली दोन दिवस मी ६ सप्टेंबरपासून आरक्षणाच्याविरोधात आंदोलन सुरू करणार असल्याच्या बातम्या सोशल मीडियावर पसरत आहेत. तसेच यासंबंधी माध्यमांकडूनही विचारणा होत असल्याने याबाबत आपण प्रसिद्धीपत्राव्दारे खुलासा करत असल्याचे म्हटले आहे.

पत्रात हज़ारे यांनी म्हटले आहे की, आरक्षणाविरोधात किंवा आरक्षणाच्या समर्थनार्थ मी कधीही कोणतेही वक्तव्य केलेले नाही. तसेच येत्या ६ सप्टेंबर रोजी मी आरक्षणाविरोधात आंदोलन करणार असल्याच्या बातम्या पूर्णत: खोटया असून, अशा बातम्या जाणीवपूर्वक पसरवण्यात येत आहेत. 

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानानुसार समता निर्माण व्हावी, या हेतूने आरक्षणाची तरतूद केली. समतेसाठी आरक्षण असणे आवश्यक आहे. पण अलिकडील काळात आरक्षणाच्या मुद्यावरून वेगवेगळ्या प्रांतात जी स्थिती निर्माण झाली आहे, ती पाहता या मुद्यावरून जातीय सलोखा धोक्यात येईल की काय, अशी शक्यता वाटते. 

अशा प्रकारे एखाद्या मुद्यावरून सामाजिक अशांतता निर्माण होऊन देशाचे तुकडे होण्याचा धोका संभवतो. त्यामुळे अशा संवेदनशील मुद्यावर सामाजिक भान राखून व्यापक चर्चा व्हावी, व समोपचाराने असे प्रश्न सोडविण्यात यावेत, असे वाटते. 

सध्या शेतकऱ्यांचे प्रश्न, वाढता भ्रष्टाचार रोखण्यासाठी लोकपाल लोकायुक्त कायद्याची अंमलबजावणी आदी महत्त्वाच्या मुद्यांवर केंद्र सरकारशी सातत्याने पत्रव्यवहार सुरू असून, सरकारने २३ मार्च 2018 पासून दिल्लीतील रामलीला मैदानावर केलेल्या आंदोलनाप्रसंगी दिलेल्या लेखी आश्वासनाचे पालन न केल्यामुळे मी येत्या २ ऑक्टोबर रोज़ी गांधी जयंतीपासून राळेगणसिद्धी येथे आंदोलन सुरू करण्याचे ठरवले आहे.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.